राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस जिल्हयात उत्साहात साजरा


रिपोर्टर: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस दि.26 जून हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हास्तर, तालुकास्तर, गाव पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. 
जिल्हास्तरावर सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते समता दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. या समता दिंडीमध्ये सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागेश चौगुले, विविध कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध शाळांमधील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही समता दिंडी मल्टीपर्पज हायस्कूल, जिल्हा परिषद येथून निघून प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पोहोचली आणि या ठिकाणी या दिंडीचा समारोप झाला. समारोप प्रसंगी समता रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
त्यानंतर सामाजिक न्याय दिनांचा मुख्य कार्यक्रम दुपारी बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह याठिकाणी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. जिल्हास्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व  अभिवादन करून झाली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. सतीश यादव व भैरवनाथ कानडे हे होते. त्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास समाजभूषण पुरस्कार विजेते, अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते व इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरही उपस्थित होते.
या कार्यक्रमात जिल्ह्यातून सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यास राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना गौरवपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. तसेच निबंध/वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येवून विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या