खाकी वर्दीत सापडलेला मानुस
     लेखक: राज ढवळे 
पोलीस म्हणलं की अरेरावी, दडपशाही असा सर्वसामान्य म्हणजे ज्यांचा पोलीस स्टेशनशी सहसा संपर्क येत नाही अशा लोकांचा समज असतो. त्यामुळे पोलीसांकडे सतत संशयी नजरेनेच पाहिले जाते. मागच्या महिन्यात कुलकर्णी नावाचे पोलीस मित्र मला एका पोलीसाचा किस्सा सांगत होते ऐकूण मी आश्‍चर्यचकित झालो. वाटलं प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि वाईट प्रवृत्तीने प्रवेश केलेला असला तरी काहीं चांगल्या लोकांमुळे प्रत्त्येक ठिकाणी अजूनही काहीं तरी चांगलं पहायला, ऐकायला मिळतय हे ही नसे थोडके.
सोनारी (परंड्याजवळ) येथे दरवर्षी भैरोबाची यात्रा असते. निवडणूका आणि यात्रा यामुळे अनेक पोलीसांना वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. कुलकर्णी सांगत होते, तिथे बंदोबस्तावर असताना एक तरुण जवळ आला आणि म्हणाला चला चहा घेऊ साहेब. कुलकर्णींच्या मनात अनेक प्रश्‍न उभा राहिले. पोलीस असल्यामुळे तर अजून जास्त उभा राहिले असणार. त्यांच्यामते या तरुणाला मी तर ओळखत नाही. माझी ड्युटीपण कधी या भागात झालेली नाही. मग हा कशामुळे ओळख दाखवत असेल. कदाचित याचा मटका किंवा जुगाराचा धंदा असावा. किंवा मग हा विनापरवाना चोरीची दारु वगैरे विकत असणार. पण मग खात्री करण्यासाठी त्यांनी त्या तरुणाला विचारले की तुम्ही कोण ? मी ओळखले नाही ? त्याने नाव, गाव सांगीतले. व्यवसाय काय असे विचारल्यावर त्याने सांगीतले शेती करतोय. कुलकर्णीना वाटले शेतकरी आहे म्हटल्यावर याचा चहा आवर्जून पिला पाहिजे.
चहा घेताना त्याने एका पोलीसाला एका पोलीसाची कहाणी सांगायला चालू केली. साहेब मी आज तुमच्या समोर आहे ते फक्त एका प्रामाणिक पोलीसामुळे ! म्हणजे मी चार वर्षापूर्वी शेती परवडत नाही म्हणून पाहुणे आणि मित्रांकडून पैसे उसने घेऊन एक सेकंडहॅन्ड टमटम विकत घेतले होते. 10-15 दिवसच झाले आणि उस्मानाबादचे एक भाडे मिळाले म्हणून मी पॅसेंजर भरुन आलो. येडशीजवळ आल्यानंतर टायर फुटले, टमटम पलटी झाले. वाहनातील लोकांना मार लागला होता, थोड्या वेळात पोलीस गाडी आली, ज्यांना जास्त लागले त्यांना उस्मानाबादच्या सिव्हील हॉस्पिटलला पाठविले. मला पोलीस स्टेशन मध्ये बसविले. काहीं वेळा नंतर तिळगुळे नावाचे एका पोलीसाने आपला जेवणाचा डब्बा मला दिला. मी म्हणालो मला भूक नाही. तरीही त्यांनी खूप आग्रह करुन मला जेवायला लावले. थोड्यावेळाने मला म्हणाले काहीं काळजी करु नको, तु खूप नशिबवान आहेस, काहीं होणार नाही. नंतर खिशातून 1000 रुपये काढून हातावर टेकवले आणि म्हणाले आता तू निवांत गावाकडे जा. घरी जाताना मुला बाळांना काहींतरी खायला घेऊन जा. मी म्हणालो साहेब नको पैसे... तुम्ही कशाला पैसे देताय ? पण त्यांनी पुन्हा जसे जबरदस्तीने मला जेऊ घातले तसे पैसे सुद्धा माझ्या खिशात जबरदस्तीने घातले. परत म्हणाले तु पैसे लगेच परत करण्याचे काही मनावर घेऊ नकोस. जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे. मला माहित नाही त्यांना माझ्या चेहर्‍यावर काय वाचले होते की ते अंतरज्ञानी होते. पण मी पोलीस स्टेशनमध्ये बसल्यापासून आत्महत्त्येचा विचार करत होतो. टमटम चा इन्शूरन्स नव्हता. कागदपत्रे अजून माझ्या नावावर नव्हती. म्हणजे कायदेशीर मी अडचणीत होतो. त्यात आर्थिक अडचण तर खूप मोठी होती. मग मरण्याशिवाय आता आपल्या हातात काय पर्याय आहे असे वाटत होते. टमटम चालू करण्याची दोरी मजबूत असते... तीच घ्यायची आणि गळ्याला फास लावायचा असा पूर्ण प्लान माझ्या डोक्यात तयार होता. परंतु या माणसाने माझ्या सगळ्या प्लानचा चक्काचूर केला. मला मानसिक आधार दिला, स्वतःचा डब्बा प्रेमाने दिला, वरुन हजार रुपये दिले आणि मुलाबाळांची आठवण देऊन गावाकडे पाठविले. तेव्हा माझ्या मनातील आत्महत्तेचा विचार कुठे निघून गेला. दुसर्‍या दिवशी सर्व पॅसेंजरनी टायर फुटून अपघात झाला आणि आम्हाला काहीं नुकसान भरपाई नको म्हणून जबाब दिला. केस जाग्यावर मिटली. आठ दिवसांनी मी त्यांना हजार रुपये द्यायला गेलो तेव्हा त्यांनी ते नाकारले आणि मला म्हणाले. संकट कोणतेही येऊ दे आत्महत्या करण्याचा विचार कधीही मनात आणायचा नाही. तेव्हापासून मला कोणताही पोलीस अगदी मोठ्या भावासारखा वाटतो. आणि त्याची सेवा करावी वाटते. मी टमटम विकले आणि परत शेती करतो आहे. पण मला आताही पोलीस दिसला की त्याला चहा पाणी करावे वाटते, जेवायला घालावे वाटते. पोलीसांवरती माझा पूर्ण विश्‍वास बसला आहे.
कुलकर्णी हे मला सांगताना म्हणाले तुमच्या भावाला शेवटच्या क्षणी असा एखादा माणूस भेटला असता तर तो आत्महत्त्येपासून रोखला गेला असता. खरय साहेब पण असे सर्वांच्याच नशिबात थोडच असतय. पण तुम्ही मात्र माझ्या भावाप्रमाणे अडकलेल्या इतर लोकांना आत्महत्तेपासून रोखू शकता. तुम्हीच त्यांना आम्हाला न्याय देऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या