पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या आ.राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
रिपोर्टर:प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०१८-१९ अंतर्गत पीक विमा हप्ता भरून देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा न झाल्याच्या तक्रारी येत आहेत. सदरील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलद्वारे पीक विमा हप्ता भरलेला आहे. परंतु, पिक विमा कंपनीकडून विमा हप्त्याची रक्कम जमा न झाल्याची सबब देण्यात येत आहे. शेतकऱ्यांची यामध्ये काहीही चूक नसून ऑनलाइन मध्ये निर्माण झालेल्या अडचणी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण व्यक्तीशः लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री ना. अनिल  बोंडे यांच्याकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे यांचे मार्फत नुकसान भरपाई वाटपाचे काम चालू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा हप्ता ऑनलाइन पोर्टलवर भरलेला असून त्यांच्याकडे रिसिप्ट सुद्धा आहेत. परंतु सदरील विमा हप्ता ची रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांची यामध्ये काहीही चूक नसल्यामुळे शेतकर्‍यांचे होत असलेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संबंधितांना आदेशीत करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री ना. अनिल  बोंडे यांच्याकडे केली आहे.

            त्याचप्रमाणे कृषि आयुक्त तथा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे मुख्य सांख्यकी अधिकारी यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली आहे. यामध्ये प्रामुख्याने जन सुविधा केंद्रांनी विमा कंपनी कडे पैसे न भरणे व विमा कंपनीकडे भरलेले पैसे कंपनीने परत पाठविणे अशा मुख्यत: दोन प्रकारच्या तक्रारी आहेत. ज्या जन सुविधा केंद्रांनी पैसे विमा कंपनीकडे भरलेच नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून वसूली करण्याबाबत व ज्या शेतकर्‍यांचे पैसे विमा कंपनी कडून परत आलेले आहेत, ते कशामुळे आले याबाबत व्यक्तिश: कारणेमीमांसा करून त्या अनुषंगाने पुढील निर्णय येणार आहेत.

            अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे जमा झालेल्या आहेत. परंतु ज्यांनी अजूनही तक्रारी दाखल केलेल्या नाहीत त्यांनी तालुका कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करून पोच घ्यावी असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. पुढील आठवड्यात या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील व्यक्तिश: कृषी आयुक्तांना भेटणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या