उस्मानाबाद जिल्हयातील दुष्काळमुक्तीसाठी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पहा काय मागण्या केल्या विधानसभेत:


दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण करा.
- आ. मधुकरराव चव्हाण
मराठवाडयातील सर्वात जास्त दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाचा दुष्काळ कायमचा हटवायचा असेल तर कृष्णा – मराठवाडा ‍सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करुन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी आ.मधुकरराव चव्हाण यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली. ते नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या दुष्काळाच्या प्रस्तावावर बोलत होते.
पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयामध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई आहे. टँकर मंजूरीसाठी उशीर होत असून मंजूरीनंतरही टँकर उपलब्ध होत नाही. दिवसेंदिवस पाण्याचे सोर्स संपत आहेत. मंजूर पाणी पुरवठा योजनेची कामे ठप्प आहेत. पाणीपुरवठा मंत्र्रयांनी सुचना देऊनही योजनेची कामे होत नाहीत. दिवसरात्र पाणी भरण्यासाठी माता भगिनी भटकंती करित आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत. आचारसंहितेमुळे कामे सुरु झाली नसल्याबाबत अधिकारी सांगतात.
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हयातील द्राक्षे,दाळींब,आंबा याच्या बागा जळालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून त्याचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. कारण अशा प्रकारच्या बागा पुन्हा लावण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. उस्मानाबाद जिल्हयामध्ये महावितरणच्या शेतातील वीजेच्या ताराच्या शॉर्टशर्किटने अनेक केळी,द्राक्ष व ऊस यांच्या बरोबरच जनावरांचा चाराही जळालेला आहे. याबाबतचे पंचनामे झालेले असून शासनाने त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
मग्रारोहयो च्या बाबतीत बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरीही मजूर झाला आहे. मग्रारोहयो ची सिंचन विहिर व घरकुल या शिवाय कुठलेही काम मंजूर नाही आणि प्रत्येक ग्रा.पं.ला फक्त 5 विहिरीची मंजूरी आहे.अनेक ठिकाणी ग्रुप ग्रा.पं.आहेत. तेथे तर 2-2 च विहिरीची मंजूरी आहे. या कामावर किती मजूर सामावून घेणार ? घरकुलासाठी वाळू उपलब्ध नसल्याने कामे ठप्प आहेत. वेळेवर बिले मिळत नाहीत. त्यामुळे जिल्हयामधून लाखोंच्या संख्येने पुण्या-मुंबईकडे स्थालांतर झालेले आहे. स्थलांतरीत लोक रेल्वे पुलाखाली,झोपडपट्रटीत,उघडया जागेवर जीवन जगत आहेत. रोहयो च्या माध्यमातून मोठया प्रमाणावर शेतरस्त्याची कामे हाती घेण्यात यावीत. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतावर रोहयो ची कामे विशेषत: पिक काढणीसह सर्व प्रकारची कामे घ्यावीत. त्याचबरोबर सर्वांना 2 रु.किलो गहू व 3 रु. किलो तांदूळ या प्रमाणे प्रति माणसी 5 किलो धान्य सरसकट देण्यात यावे. सध्या राज्यकर्त्याकडून केवळ घोषणाबाजी सुरु आहे. पालकमंत्री पाणंद शेतरस्ते योजनांतर्गत एकही काम सुरु नाही. त्यामुळे मजूरांच्या हाताला काम, वेळेवर दाम आणि खाण्यासाठी धान्य द्यावे.
खरीप हंगाम पिकविम्याबाबत बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, गतवर्षी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही.अधिकाऱ्यांनी चुकीचे पंचनामे केले. मा.मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले की शासन त्यांना नुकसान भरपाई देईल. उस्मानाबाद येथील आढावा बैठकीत सांगितले परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. ती तातडीने द्यावी. यावर्षी उमरगा, भूम व वाशी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर झालेला नाही. पाऊसाचा खंड, पावसाचे प्रमाण या सर्व गोष्टीची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असतानाही फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे पिकविमा मंजूर झालेला नाही शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ. चव्हाण यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयाचा दुष्काळ खऱ्या अर्थाने कायमस्वरुपी हटवायाचा असेल तर कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. 2007 साली औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 21 टीएमसी पाणी मंजूर केले,मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून यासाठी वारंवार आवाज उठवला. जिल्हयामध्ये मोठी नदी नाही, मोठा तलाव नाही त्यामुळे कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पा शिवाय पर्याय नाही. या प्रकल्पासाठी व भिमा – कृष्णा  स्थिरीकरण या दोन प्रकल्पासाठी 10 हजार 400 कोटीची गरज असताना फक्त 300 कोटीची तरतूद केली जाते. अशा प्रकारची तरतूद करुन आमच्या कोणत्या पिढीला आपण पाणी देणार आहात असा घणाघाती सवाल करुन आ.चव्हाण म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची मागणी करावी. परंतु राज्य सरकारने अदयाप केंद्राकडे प्रस्तावसुध्दा दिलेला नाही. औरंगाबाद येथील मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला दरवर्षी रु.1200 कोटी देण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री महोदयानी तीन वर्षापूर्वी केली होती. परंतु ती घोषणा फक्त घोषणाच ठरली निधी मिळालाच नाही. आमचा जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळी आहे या दुष्काळाचे निर्मूलन करायचे असेल तर प्राधान्याने कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची आग्रही मागणी आ.चव्हाण यांनी लावून धरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या