पीक विम्याचे खाजगीकरण आणि संबंधित कंपन्यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक: आ.बसवराज पाटील


रिपोर्टर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कपात सूचनेच्या आयुधाद्वारे औसा विधानसभेचे आमदार तथा काँग्रेस विधिमंडळाचे मुख्य प्रतोद बसवराज पाटील यांनी पीकविम्याचे माध्यमातून शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक होत असून संबंधित विमा कंपन्यांचे आर्थिक उखळ पांढरे होत आहे यावर तपशीलवार वाचा फोडली आहे.
     यासंबंधी कपात सूचना मांडताना आ.बसवराज पाटील यांनी पूर्वी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय हवामान आधारीत पिक विमा योजनेऐवजी पंतप्रधान पिक विमा योजना मोठा गाजावाजा आणि नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीवर प्रेम दाखवत देशभरात तसेच राज्यातही राबवली खरी, पण या योजनेतून फक्त संबंधित विमा कंपन्यांचेच हित जोपासल्याचे स्पष्ट झाले असून बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजना सक्तीची केली खरी पण या कर्जातून पिक विमा हप्ता बँकेने परस्पर कपात करुन विमा कंपनीप्रती जी तत्परता दाखविली तेवढी तत्परता मात्र विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई अदा करताना दाखविली नाही असे नमूद करुन रिलायंस सह कोणत्याच विमा कंपन्यांनी नियमाप्रमाणे ३ आठवड्यांत पिक विम्याची भरपाई केली नसल्याने तसेच लाखो शेतकऱ्यांचे सुमारे १ हजार कोटी रुपयांचे दावे अद्यापही अदा करण्यात आलेले नसल्याने व शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या नोंदीदेखील विमा कंपन्या ठेवत नसल्याने महालेखापाल नियंत्रकांनी घेतलेल्या आक्षेपाकडे आ.बसवराज पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
       एकट्या लातूर जिल्ह्यामध्ये सुमारे ९ लाख खात्यांमध्ये पिकविम्याचा हप्ता भरलेला असताना शासनाच्या दोषपूर्ण ऑनलाईन पोर्टलमुळे केवळ ३ लाख ८ हजार ४७८ शेतकरी लाभान्वित दाखवून फक्त १३४ कोटी १ लक्ष ७२ हजार ४३० इतकी रक्कम दाव्यापोटी मंजुर केली याकडे कपात सूचनेद्वारे वाचा फोडून अशीच परिस्थिती मराठवाड्यातील विशेषत: औसा, निलंगा, कळंब, लोहारा, उमरगा व उस्मानाबाद तालुक्यातील हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित असल्याने पिक विमा व पिक कापणी धोरण सुधारण्याची आवश्यकता व दोषपूर्ण ऑनलाईन पोर्टल बनविणारी सॉफ्टवेअर कंपनी आणि विमा कंपनी याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी या कपात सूचनेद्वारे आ.बसवराज पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या