विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखुन ध्येय निश्‍चिती करावी : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
एकता फाऊंडेशन व यशदा मल्टीस्टेटच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी सोहळा उत्साहात

    रिपोर्टर: विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून स्वत:चे ध्येय निश्‍चित करावे व ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घ्यावेत असे मत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी एकता फाऊंडेशन व यशदा मल्टिस्टेटच्या वतीने रविवार दि. २३ जून रोजी उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळ्यात व्यक्त केले.

         या प्रसंगी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उस्मानाबाद न.प.चे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, यशदा मल्टिस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

          या कार्यक्रमात पुढे बोलताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मनातील नकारात्मक भावना काढून सकारात्मक पद्धतीने सर्व विषयांकडे पाहुन अभ्यास करावा मोबाईलवर वेळ वाया घालवु नये, मोबाईलवर प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यापेक्षा ती स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन शोधावीत त्यामुळे मेंदूला चालना मिळते. क्रमिक अभ्यासक्रमाच्या पुस्तकासह जनरल नॉलेजसाठी रोजचे वर्तमानपत्र, मॅगजीन्स, थोर व्यक्तींचे चरित्र आदिंचे वाचन करावे, मोबाईलमुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आज हरवली आहे. मोबाईलचा कमी वापर केल्यास तुमची विचारशक्ती आपोआप वाढेल. विद्यार्थ्यांच्यावर पाठीवर कौतुकाची थाप देणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी एकता फाऊंडेशन व यशदा मल्टिस्टेटच्या पदाधिकार्‍यांचे व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

          पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी परिश्रम करावेत, पालकांनी देखील विद्यार्थ्यांचा कल पाहुन त्यांच्या अभ्यासक्रमाची निवड करावी. आजकाल मुलांपेक्षा मुलांच्या भवितव्याबाबत आई-वडीलच जास्त अभ्यास करीत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे पालकांनी लादु नये त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी द्यावी. गुणवत्तेसाठी कौटुंबीक पार्श्‍वभूमी चांगली पाहिजे असे काही नाही. विद्यार्थ्यांनी शाळेतील शिकवण्यावरच भर देऊन घरी अभ्यास करावा, त्यासाठी वेगळी ट्युशन व क्लासची गरज नाही. अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चे समर्पण दिल्यास त्यांची स्वप्ने पुर्ण होतात, इतरांचे पाहुन आपल्या मुलाच्या करिअरची निवड पालकांनी करु नये. कोणत्याही शाखेची विद्यार्थ्यांनी पदवी घेऊन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केल्यास त्यांना उच्च अधिकारी पदाची संधी मिळू शकते असे त्यांनी स्वत:च्या अनुभवाने सांगितले.

          यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले की, विद्यार्थी व पालकांनी डोळसपणे व समजसपणे करिअरची निवड करावी, १० वी व १२ वी परिक्षेतील गुण हे तुमच्या करिअरची दिशा ठरवत नाहीत तर येथुन पुढे तुम्ही जो अभ्यासक्रम निवडाल त्यामध्ये मन लावुन अभ्यास केला व लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परिक्षा दिल्यास विद्यार्थी मोठ्या पदावर काम करु शकतात असे त्यांनी सांगितले.

          या प्रसंगी न.प.चे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी देऊन करण्यात आला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व वृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकात दोन्ही संस्थेची सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी एकता फाऊंडेशनचे सचिव अभिलाष लोमटे यांनी संस्थेच्या मागील काही वर्षातील सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन संस्था वृक्ष संवर्धन व इतर क्षेत्रात कार्य करीत असल्याची माहिती दिली.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिलाष लोमटे व आभार प्रदर्शन महेश शेरकर यांनी केले. यावेळी प्रकाश गरड, जिक्रीया पटेल, वैभव देशमुख, विशाल थोरात, सनी मुंडे, यशवंत लोमटे, किरण पाटील आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशदा व एकता परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


संस्था लवकरच विद्यार्थी समुपदेशन केंद्राची उभारणी करणार

          विद्यार्थ्यांच्या मनातील नैराश्य भावना दूर करण्यासाठी जिल्ह्यात समुपदेशन केंद्र उभारणीचा मानस यशदा व एकता या दोन्ही संस्थेच्यावतीने सुधीर सस्ते व अभिलाष लोमटे यांनी व्यक्त केला व यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ समुपदेशन केंद्र उभारणी व दरमहा समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या