पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी घेतला पाणी व चारा टंचाईचा सविस्तर आढावा
उस्मानाबाद: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधान सचिव पर्यावरण विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनिल डिग्गीकर  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील पाणी टंचाई व चारा टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यातील  दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा व्यापक आढावा आज झालेल्या या पाणी टंचाई व चारा टंचाई आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली.
          रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजूरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरण करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
       उस्मानाबाद मध्ये सध्या 140 गाव-वाड्यांमध्ये 177 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. टॅंकरसाठी एकूण १४२ गावातील १७१ विंधन विहिरी तर टॅंकरव्यतिरिक्तसाठी एकूण ३२७ गावांतील ६६० विंधन विहिरी असे एकूण ४६९ गावातील ८३१ विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
        जिल्ह्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 87 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 61 हजार 102 मोठी आणि 7 हजार 136  लहान अशी एकूण 68 हजार 238 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
        जिल्हा पाणी टंचाई व चारा टंचाई बाबतच्या या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तसेच जिल्हयातील विविध यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या