'धकधक गर्ल' माधुरीचा आज वाढदिवस

आपल्या सुमधूर हास्याने आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या 'धकधक गर्ल' चा अर्थात माधुरीचा दीक्षितचा आज वाढदिवस. 52 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माधुरीच्या सौंदर्याचे आजही लाखो लोक दिवाने आहेत. चला आज जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी...
15 मे 1967 साली मुंबईमध्ये माधुरीचा जन्म झाला. शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याचीही इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जोडीदार डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले.
1984 मध्ये 'अबोध' सिनेमातून माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र माधुरीला लगेच लोकप्रियता मिळाली नाही. जवळपास चार वर्षांनंतर 'तेजाब' सिनेमाने तिला खरी ओळख मिळाली. माधुरीने त्यानंतर राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके हैं कौन, राजा आणि दिल तो पागल है या सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केले.
 सर्वोत्तम नृत्यांगना :
 वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने कथ्थक नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. खुद्द कथ्थक नृत्यातील दिग्गज बिरजू महाराज यांनी माधुरी ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम नृत्यांगना असल्याचे म्हटले होते.
आधी अपयश मग यश : सुरुवातीला माधुरीच्या 'अबोध', 'स्वाती', 'हिफाजत', 'दयावान' आणि 'खतरों के खिलाडी' याचित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला होता. अखेर 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.
 14 फिल्मफेअर नामांकनं : माधुरी ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जिला 14 फिल्मफेअर नामांकनं, चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दोन दुसऱ्या विभागातील पुरस्कारही मिळाले होते.

 वजनदार पोषाख : 'देवदास' चित्रपटातील 'काहे छेड छेड मोहे' या गाण्याच्या चित्राकरणाच्या वेळी माधुरीने घातलेल्या संपूर्ण पोषाखाचं वजन हे जवळपास तीस किलो इतकं होतं. नीता लुल्ला या फॅशन डिझायनरने हा पोषाख डिझाईल केला होता.

 सर्वाधिक मानधन : कारकिर्दीच्या एका टप्प्यावर यशशिखरावर असताना माधुरी हिंदी कलाविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती. 'हम आपके है कौन' या तिने जवळपास 2.7 कोटी रुपये आकारले होते, असे म्हटले जाते.

 एम.एफ. हुसैन यांनाही भुरळ : प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन हेसुद्धा 'हम आपके है कौन' या चित्रपटात माधुरीला पाहून भारावले होते. त्यांनी हा चित्रपट 67 वेला पाहिला होता. तिच्या 'आजा नचले' या चित्रपटासाठी तर त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहातील तिकीटीच विकत घेतल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या