पाणीटंचाई संदर्भात पालिकेच्या कारभा—यांना आयुक्ताने खडसावले लवकरात लवकर टंचाई दुर करण्याचे आदेश:


शहरवासीयांच्यावतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले विभागीय आयुक्तांचे आभार..

                  केवळ पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या, तर उस्मानाबाद शहराला पाणीप्रश्न भेडसावला नसता. तातडीने विंधन विहिरींचे अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा आणि गळती थांबवण्यासाठी  कालबध्द कार्यक्रम तयार करा. यात कुचराई केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा तीव्र शब्दात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांची कानउघडणी केली.

उस्मानाबाद शहराला उजनी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. पालिका प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देवूनही त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याने आ.पाटील यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी संपर्क साधला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून पूर्वनियोजित बुधवारच्या दौर्‍याऐवजी तातडीने शनिवारी आयुक्त केंद्रेकर यांनी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली, सुमारे दीड तास बैठक चालली.
या बैठकीस केंद्रेकर यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि उस्मानाबाद पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. जलवाहिनीची गळती थांबविण्याबाबत हलगर्जीपणा का केला? देखभाल दुरूस्तीवर लाखो रूपये खर्च करूनही गळती का थांबली नाही? तेरणा धरणाचा जलसाठा कमी होत असताना पर्यायी स्त्रोत शोधून उपाययोजना का केल्या नाहीत? गरजेनुसार शहरात पाणी टँकर का सुरू करण्यात आले नाहीत? तसेच तीव्र पाणीटंचाई असतानाही शहरात विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्याबाबत कुचराई का करण्यात आली? असा प्रश्नांचा भडीमार आयुक्त केंद्रेकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी मनोहरे यांच्यावर केला.

पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी मनोहरे यांना यावेळी काहीच ठोस माहिती देता आली नाही. दरम्यान आपणही यापूर्वी मुख्याधिकार्‍यांना पाणी टँकर सुरू करणे आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्याबाबत सूचित केले होते. मात्र मुख्याधिकार्‍यांनी सूचना गांभीर्याने घेतली नसल्याचे जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. केवळ पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना होत असलेला त्रास आपण सहन करणार नाही, अशा तीव्र शब्दात केंद्रेकर यांनी पालिका प्रशासनाला झापले.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हातलाई धरणात सध्या बारा कोटी लिटर पाणी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रतिदिन ४० लाख लिटर पाणीउपसा केल्यास पुढील २० दिवसांची उस्मानाबाद शहराची गरज त्यातून भागविता येईल. शहरातील विंधन विहिरींचे अधिग्रहण, त्याचबरोबर गरजेनुसार चोराखळी तलावातील पाणी टँकरद्वारे पुरविण्यात यावे. उजनीच्या जलवाहिनी आणि वॉल्वच्या ठिकाणी असलेली गळती दुरूस्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सक्षम यंत्रणा उभी करणे तसेच फ्लो-मीटर दुरूस्त करून टप्पा क्रमांक २ चे काम कालबध्दरित्या पूर्ण करण्यात यावे, याबाबत आपल्या सूचना मांडल्या. विभागीय आयुक्तांनी आपल्या विनंतीवरून या गंभीर प्रश्नाची दखल घेत पालिकेच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी तात्काळ बैठक आयोजित केल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांच्यावतीने त्यांचे आभार मानले.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा: केंद्रेकर

आयुक्त केंद्रेकर यांनी उस्मानाबाद शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांनी २ दिवस थांबून व्यक्तिशः संपूर्ण योजनेंची पाहणी करून गळती थांवण्याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले.हातलाई साठवण तलावातून गरजेनुसार पाणी उपसा ,विंधन विहिरींचे अधिग्रहण, चोराखळी तलावातून गरजेनेनुसार टँकरने पाणीपुरवठा व इतर बाबींबद्दल जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.मजीप्रा च्या अभियंत्यानी तेरणा व रूईभर पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती व क्षमतावाढ आणि आ.पाटील यांनी सुचवल्या प्रमाणे चोराखळी धरणातून येडशी,तडवळा सह उस्मानाबाद शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. वाढीव ८  एमएलडी सह १६ एम एल डी ची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या