सुजाण मतदारांनी कर्तव्य म्हणून मतदान करावे - मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचे आवाहन!


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील शहरी भागातील १७ मतदारसंघांमध्ये दि. २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. शहरी भागात मतदानाची कमी टक्केवारी ही चिंतेची बाब आहे. मतदानाच्या दिवशी जोडून सुट्ट्या आल्या असल्या तरी मतदानाचे कर्तव्य बजावून लोकशाही समृद्ध करणाऱ्या राष्ट्रीय महोत्सवात सुजाण नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी केले आहे.

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करताना अश्वनी कुमार म्हणाले, प्रत्येक मतदाराला निर्भय व मुक्त वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वसाधारणपणे, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदानाचे प्रमाण कमी असते असा आजवरचा अनुभव आहे. यावेळी ही परिस्थिती बदलली पाहिजे.

मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा लौकीक प्राप्त झाला आहे. ते या महानगरातील आणि परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नाचे यश आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविणे ही सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्या म्हणून बाहेरगावी जाऊ नका. मतदान करा. महिलांनी व युवकांनी देखील मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा सर्वस्वी आपला आहे. तेव्हा तो बजावलाच पाहिजे.

लोकशाही बळकट करण्यासाठी या राष्ट्रीय महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणाने मतदान करा, असे आवाहन श्री. कुमार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या