बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातुन आत्महत्याग्रस्त व त्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी मदत:

 उस्मानाबाद: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे जिल्हयातील आत्महत्याग्रस्त व त्रस्त शेतकरी कुटुंबासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत सामूहिक / नोंदणीकृत विवाहाची योजना राबविण्यात येत आहे.   
उपमुख्य कार्यकारी (ग्रा.पं.)उस्मानाबाद यांनी घोषित केलेल्या त्रस्त व आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या यादीतील  लाभार्थ्यांच्या मुलीच्या विवाहासाठी प्रति जोडपे रु.15 हजार  अनुदान देण्यात येते. तथापि प्रत्यक्ष लाभ निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच दिला जाईल,याची नोंद घ्यावी.
दोन्ही योजनेंतर्गत मुलीच्या आईस, आई  हयात नसेल तर वडिलांस व दोघेही हयात नसतील तर मुलीस तिच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रति जोडपे रु.15 हजार इतके अनुदान दिले जाते. विवाह त्रस्त कुटुंबातील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचा असणे आवश्यक आहे.
सध्या लग्नसराई सुरु असून त्रस्त कुटुंबाच्या यादीतील किंवा  आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचा विवाह झाला असेल किंवा होणार असेल तर प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.संबधितांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत रुम नं. 10 तळमजला, डावी बाजू, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
त्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे--
विवाहाच्या वेळी  बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमातर्गत भंग या दाम्पत्य/कुंटुब यांचे कडून झालेला नसावा या बाबतचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (Affdavit) सादर करणे आवश्यक आहे.(साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र), जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत (TC) किंवा TC नसेल तर जन्माचा स्थानिक प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे वयाबाबत प्रमाणपत्र, लाभार्थी हा शेतकरी/शेतमजूर असल्याबाबतचा पुरावा म्हणून संबंधीत पालक शेतमजूर असल्याबाबत संबंधीत गावातील ग्रामसेवक/तलाठी यांचा दाखला व त्या गावचे रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक/तलाठी  यांचा रहिवासी दाखला तसेच जमीनीचा 7/12 उतारा तसेच जमीन नसेल तर तलाठी यांचे भूमीहीन प्रमाणपत्र, वधूच्या आईचा किंवा वडिलांचा उत्पन्नाचा दाखला (तलाठी) (वार्षिक उत्पन्न रु.1लाखाच्या आत असणे आवश्यक), विवाह नोंद प्रमाणपत्र (ग्रामसेवक/विवाह निबंधक / न.प.मुख्याधिकारी), वधू-वरांचा लग्नाचा फोटो, वधूच्या आईचा पासपोर्ट फोटो, वधूच्या आईचे आधार कार्ड, बँक पासबुक (पहिल्या पानाची झेरॉक्स).
तरी गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या