नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे शहरवासीयांना मिळते पंधरा दिवसाला पाणी : राष्ट्रवादी


रिपोर्टर: उस्मानाबाद शहराला दुष्काळी परिस्थितीत टंचाईच्या झळा बसू नये यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असलेल्या उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी डॉ.पद्मसिंह पाटील यांनी २००४ साली आरक्षण मंजूर करून घेतलं होतं. केंद्र शासनाच्या UIDSSMT या योजनेअंतर्गत ११४ किमी अंतर असलेली ८ दश लक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची महत्वाकांक्षी योजना एप्रिल २०१३ मध्ये कार्यान्वित करून उस्मानाबाद शहरात उजनी धरणाचे पाणी आणलं होतं.योजना तयार करताना त्यात भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास शहरासोबत शहरानजीकच्या ग्रामीण भागाला पण पाणी उपलब्ध होऊ शकेल याची तरतूद केली होती.
पहिले ३.५ ते ४ वर्ष ही योजना योग्य क्षमतेने चाल होती.सद्यस्थितीत मात्र नगरपालिकेच्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे,योजनेच्या देखभाल दुरुस्ती साठी योग्य ती तरदूत न केल्यामुळे गळती वाढली व प्रतिदिन ८ दश लक्ष लिटर (MLD) ऐवजी केवळ ४-४.५ दश लक्ष लिटर (MLD)पाणी उपलब्ध होत आहे.परिणामी उजनी धरणात मुबलक पाणी असताना शहरवासीयांना १५ - २०  दिवसांनी पाणी मिळत आहे.
आजची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शहर वासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना योग्य क्षमतेने चालवणे आवश्यक आहे.योजना योग्य क्षमतेने चालल्यास प्रतिदिन ८ MLD पाणी उपलब्ध होईल. दुष्काळी परिस्थितीत शहरी भागासाठी प्रति माणसी ४० लिटर या माणकानुसार शहराला ५ MLD पाणी उपलब्ध होईल व उरलेले ३ MLD पाणी ग्रामीण भागासाठी देता येईल.
सन २०१३ साली उजनी योजना कार्यान्वित झाली तेंव्हा यावर्षी पेक्षा गंभीर दुष्काळ असताना,अंतर्गत जलवाहिनीची कामे झालेली नसताना,नगरपालिकेने योग्य नियोजन केल्यामुळे शहरवासीयांना दर ३ -४ दिवसाला पाणी  मिळत होते.आज अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे,धरणात मुबलक पाणी उपलब्ध असतानाही नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे १५ - २० दिवसाला पाणी मिळत आहे.परिणामी जनतेला पाणी विकत घ्यावे लागत आहे तर कांही ठिकाणी माता भगिनींना पाण्यासाठी ऊन असताना फिरावं लागत आहे.शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची घालून योजना कार्यान्वित झालेली असताना त्याचा लाभ जर शहरवासीयांना मिळत नसेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
शहरातील १ लाख ३० हजाराहून अधिक लोकसंख्येला पाणी असताना केवळ नियोजनाचा अभाव असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे ही बाब फार गंभीर आहे याबाबत जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे.उस्मानाबाद शहरवासीयांची अडचण दूर करण्याबाबत आपणा सोबत दोन वेळा दूरध्वनीवर केलेल्या चर्चे नुसार आपण तातडीने नगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी,कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन शहराच्या पाणीपुरवठा वितरणाबाबत असलेल्या त्रुटी त्वरित दुरुस्त करून उस्मानाबाद शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत व्हावा यासाठी तांत्रिक दृष्ट्या सक्षम वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी व उस्मानाबाद शहरवासीयांची पाणी समस्या सोडवावी आशी मागणी शहरवासीयाकडुन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या