राजमाता जिजाऊ मुलींच्या वस्तीगृहाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लोकार्पण:


   शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना उस्मानाबाद शहरामध्ये मोफत राहण्याची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डायट कॉलेज समोर उभारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील  म्हणाले की, सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना मोफत राहण्याची व्हावी यासाठी वस्तीगृह सुरु करण्याचा स्तुत्य व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चना पाटील यांनी याकामी पुढाकार घेवून एक चांगली संकल्पना मूर्त स्वरुपात आणली. या वस्तीगृहाची क्षमता १०० मुलींची असून खोल्यांची साईज व रचना पाहता या पेक्षा जास्त मुलींची राहण्याची सोय करणे शक्य आहे. अनेक पालक खर्चामुळे मुलींना शिक्षणासाठी शहरात पाठवत नाहीत. परंतु या माध्यमातून मोफत राहण्याची सोय होत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थीनींना याचा लाभ होणार आहे. याच इमारतीमध्ये उमेद अंतर्गत अभ्यासिका असल्याने विद्यार्थीनींना पुस्तके व संगणक उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध असणार्‍या मैदानाचा उपयोग पोलीस व तत्सम पद भरतीसाठी आवश्यक असलेल्या मैदानी प्रशिक्षणासाठी व क्रिडांगणासाठी करणे शक्य आहे.

ही जागा मराठा मुलांच्या वस्तीगृहासाठी न दिल्याची खोटी माहिती सोशल मिडियाद्वारे पसरविण्यात आली होती. मराठा मुलांच्या वस्तीगृहासाठी ही इमारत भाडे तत्वावर मागीतली होती. यापूर्वीच या जागेवर मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचे क्षिक्षण समितीच्या बैठकीत ठरले होते, तरी देखील गरज लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे याबाबतचे संमती पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. परंतु शासनाने पुढे कांहीच कार्यवाही केली नाही. जिल्हा प्रशासनाने तद्नंतर शासकीय तंत्रनिकेतन मधील इमारत वापरण्याचा निर्णय घेतल्या नंतर वापराविना ही इमारत धुळ खात पडून वाया जावू नये व ग्रामीण भागातील मुलींची मोफत राहण्याची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने मुलींचे वस्तीगृह करण्याचा निर्णय घेतला. केवळ घोषणा बाजी मध्ये अग्रेसर सरकारने कोठेही केलेल्या घोषणे प्रमाणे मराठा समजाच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केलेले नाही. त्यामुळे ज्यांनी याबाबत खोटं सांगून गैरसमज पसरवून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांची चौकशी करुन कारवाई करण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केल्या.

यावेळी बोलताना जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील म्हणाले की, मुलींसाठी वस्तीगृहाची सोय करणारी बहुधा ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद आहे. गोर-गरीब कुटुंबातील मुलींना व त्यांच्या पालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.