रिपोर्टर: आचारसंहिता सुरू झाली असून, प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागानेही आता अधिक सतर्कतेने काम करण्यास सुरुवात करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी पोलीस यंत्रणेला आज येथे दिली.
आचारसंहितेचे पालन आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी व कर्तव्ये याबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे, राठोड,.धस, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे हे उपस्थित होते.
दीपा मुधोळ-मुंडे यांनी पोलीस विभागाची जबाबदारी व भूमिका निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत खूप महत्त्वाची आहे, ज्या ठिकाणी काही गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे,त्या मतदान केंद्राबाबत पोलिसांनी आतापासूनच सुरक्षितेबाबत अधिक तयारी करून ठेवावी, समाजातील समाजकंटकांची इत्यंभूत माहिती घेऊन, त्यांच्यावर आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई तात्काळ करावी, शस्त्र परवानाधारकांबाबत अद्ययावत माहिती ठेवावी तसेच मद्य विक्रीवरही करडी नजर ठेवावी, अशा सूचना पोलिस विभागास दिल्या.
मुधोळ-मुंडे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेट विषयी माहिती देऊन मतदानाच्या दिवशी पोलीस अधिकारी-कर्मचार्यांनी पोस्टल बॅलेटचा उपयोग करून आपलाही मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.
या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे पोलिस विभागाचे अधिकारी ही उपस्थित होते.