पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई:


रिपोर्टर: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या हल्ल्यात हात असल्याच्या संशयावरून पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुणे एटीएसच्या सरकार्याने ही कारवाई केली. बिहार दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील चाकण परिसरात कारवाई केली. अटक केलेला 19 वर्षीय तरुण मुळचा पश्चिम बंगालमधील असून त्याचे पूर्ण नाव समजले नाही. त्याच्याकडे सैन्याबाबत माहिती, नकाशे आणि पुलवामा हल्ल्याबाबतचे इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्याला न्यायालयापुढे हजर करून पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आले आहे. बिहारमधील पटना रेल्वे स्टेशनबाहेर दोनच दिवसांपूर्वीच संशयितरीत्या फिरणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे या बांगलादेशी नागरिकांकडेही पुलवामा हल्ल्यासंदर्भात कागदपत्र सापडली आहेत. चौकशी वेळी दोघेही दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज पुण्यात कारवाई करण्यात आली. दरम्यान, जैश-ए-मोहमदने पुलवामा येथे भारतीय जवानांच्य ताफ्यावर हल्ला केला होता. स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकावल्याने झालेल्या स्फोटात सैन्यातील 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याची जोरदार मोहीम उघडली. तसेच पाकिस्तानमधील बालाकोटच्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईकही केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या