उस्मानाबादी शेळी काल, आज आणि उद्या






ग्रामीण भागाचे दारिद्रय निर्मूलन करण्याचे प्रचंड सामर्थ्य शेळीपालनात आहे, असे महात्मा गांधीजी म्हणत असत. शेळीला गरिबांची गाय म्हणतात. महाराष्ट्रात एकूण पशुधनाच्या संख्येत 26% शेळ्या आहेत. महाराष्ट्रात 1 कोटी 30 लाख एवढे शेळीधन आहे व जवळपास 40 लाख कुटुंबाची गुजराण शेळीपालनामुळे होते. जागतिक अन्न संघटनेच्या मते 49 टक्के लोक शेळीचे दूध पितात.शेळीचे दूध पचावयास हलके असते तसेच काविळ, अल्सर, मधुमेह या आजारांबाबतच्या विविध तक्रारींसाठी शेळी दूध उपयुक्त आहे.शेळीचे दूध म्हणजे A.T.M. सर्व काळ दूध होय. भारत देशामध्ये जवळपास 9 कोटी शेळ्या असून शेळीपालनात आपण जगाच्या तुलनेत पाचव्या क्रमांकावर आहोत. 

भारत देशामध्ये शेळ्यांच्या जवळपास 29 जाती आहेत, उस्मानाबादी शेळीत करडे देण्याचे प्रमाण अधिक असून जास्त काटक, रोगराईस सहजासहजी बळी न पडणारी आहे. कोणत्याही वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता, रुचकर,चवदार,त्वचा पातळ मुलायम, रंग काळा, पाठशिंगी, खूर काळे टणक,  मजबूत मान, लांब व बारीक, शेळीचा आकार दुधाच्या कॅन सारखा असतो. गर्भधारण काळ  पाच महिने असून विल्यानंतर 1 ते 2 महिन्यात लगेचच गर्भधारणा होऊ शकते म्हणजे दोन वेतांमधील अंतर कमी आहे.

येडशी, उस्मानाबाद येथे दर शनिवारी शेळी व इतर प्राण्यांचा चमडे बाजार भरतो. संपूर्ण भारतातून चमडा व्यापारी येथे येतात. बाजारातील  एका दिवसाची उलाढाल 20 ते 25 कोटी रुपयांच्या घरात असते. सर्वात महागडे म्हणजे शेळीच्या मटणाचा भाव प्रतिटन पाच लाख रुपये एवढा असतो. शेतमालात कोणत्याही पिकाचा एवढा भाव नाही. प्राणी मेल्यानंतर ताबडतोब नष्ट करावे लागतात परंतु शेळी मेल्यानंतर तिचा कोणताही भाग वाया जात नाही. शेळयांमध्ये  घसारा (Depreciation)  नाहीच  व विक्रीसाठी शेळया A.T.M. (सर्व काळ पैसा ) आहे. शेळीच्या निवार्‍यासाठी जास्त खर्चही येत नाही.

उस्मानाबादी शेळी चे आयुष्यात 35 ते 40 करडे जन्मतात. शेळीपालन असे होते 90% शेळीपालक हे दारिद्र रेषेखालील असत. शेळीपालनात साक्षरतेचे प्रमाण 20 ते 30 टक्के होते व मजूर पुरुष स्त्रिया व अल्पभूधारक यांचे प्रमाण जास्त असे.शेळीपालनात स्वच्छतेच्या व लसीकरणाच्या अभावामुळे करडयांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यामुळे शेळीपालनात नफ्याचे प्रमाण कमी होते. शेळी बाजारात वजनावर विक्रीला जात नसून नगावर विक्रीला जात असे.पर्यावरणाचा शत्रू समजले जात असे.बाजारात 1 शेळी 60 रुपये ते 150 रुपयांपर्यंत विकली जात असे. मात्र आता शेळीपालन शास्त्रीय पद्धतीने करण्याकडे कल असून सुशिक्षित वर्ग शेळीपालनासाठी शासनाच्या अनेक योजना ज्या जिल्हा परिषद, महामंडळ, पंचायत समिती समाजकल्याण खाते यांच्यामार्फत राबविल्या जात आहेत,त्याचा लाभ घेऊ लागले आहेत. शेळीचे मांस स्वच्छ जागेत व दर्जेदार दुकानात विकण्याकडे खाटीक लोकांचा कल  दिसून येत आहे. शेळीच्या चामड्यापासून पादत्राणे निर्मिती,कोल्हापुरी चपला इ. दिसून येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळाची महाराष्ट्रात 10 कार्यालये असून त्यांच्यामार्फत शेळीपालनासाठी कर्जपुरवठा, प्रशिक्षण व त्यांची विक्री होत आहे.