राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:
उस्मानाबाद : स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि लढ्यामुळे भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला़ स्वातंत्र्य सैनिकांचे देशासाठीचे योगदान अनमोल व अद्वितीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले़
उस्मानाबाद येथे आज (दि़४) राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत धाबेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला़ नागरी सत्कार समितीच्या जि़प़ यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पाटील हे होते़ प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, प्रदीप साळुंके, राजाभाऊ बागल, राजेंद्र घोडके, शिवसेना नेते भारत इंगळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश चिटणीस मसूद शेख, भाजपाचे मीडिया विभाग जिल्हाप्रमुख तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे, नागरी सत्कार समितीचे निमंत्रक धनंजय शिंगाडे यांची मंचावर उपस्थिती होती़ समितीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत धाबेकर यांचा राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रारंभी भव्य सत्कार करण्यात आला़ या समितीचे मुख्यमंत्री हे अध्यक्ष असून, सचिव म्हणून  धाबेकर यांची नियुक्ती करुन शासनाने उस्मानाबाद जिल्हा व मराठवाड्याचा मोठा सन्मान केल्याचे मत माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे यांनी व्यक्त केले़

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शामराव कुलकर्णी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष गौतम इंगळे, स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, विठ्ठल पाटील, तानाजी जमाले, रावसाहेब डोके, फुलचंद गायकवाड, अ‍ॅड़ सय्यद, रवी कोरे, प्रसाद धाबेकर यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंगाडे, सुत्रसंचालन राजेंद्र अत्रे तर आभार ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक यांनी व्यक्त केले़