युवाशक्तीने सकारात्मक ऊर्जेने झटून काम करावे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे


जिल्हयात डिस्ट्रीक्ट इंटर्नशिप प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ

रिपोर्टर:- जिल्ह्यात युवाशक्ती मोठ्या संख्येने आहे, या युवाशक्तीने स्वतःचे करिअर घडवत असतानाच त्यांनी सकारात्मक ऊर्जेने झटून काम करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
जिल्ह्यात डिस्ट्रीक्ट इंटर्नशिप प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद सभागृह येथे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते ,अपर जिल्हाधिकारी पराग सोमण,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, डाएटचे प्राचार्य डॉ. कलीम शेख हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे म्हणाल्या,युवा पिढीने आळस न करता झटून ऊर्जेने काम करायला हवे. स्वतःला स्वतःच प्रोत्साहित करून स्वतः बरोबरच समाजासाठीही काम करत राहायला हवे. डिस्ट्रिक्ट इंटर्नशिप प्रोग्राम हा आपल्या जिल्ह्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेला शासकीय योजनांची ओळख करून देण्यात येणार आहे आणि त्याही पुढे जाऊन गरजूंना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत असताना काय अडचणी येतात, हे समजून घ्यावयाचे आहे तसेच हे अत्यंत महत्त्वाचे काम करीत असताना तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच काम करणार आहात, त्यामुळे आपले वागणे-बोलणे सर्व काही अत्यंत शिस्तबद्ध, व्यवस्थित असावे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या,आकांक्षित जिल्हयांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मुख्यतः शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास व आर्थिक क्षेत्रातील योजनांवर लक्षपूर्वक अधिकाधिक काम करावे लागणार आहे, त्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून युवाशक्तीचा आपण सहभाग घेत आहोत.

हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर चालविला जाणार असून विद्यार्थ्यांनी आपले योगदान शंभर टक्के द्यावे. यापुढील टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनही प्रशासनाकडून सुरू केले जाणार आहे.  तुम्ही आपले काम प्रामाणिकपणाने करा, शासनाकडून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांचाही जरूर विचार केला जाईल,असेही श्रीम. मुधोळ-मुंडे म्हणाल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अपर जिल्‍हाधिकारी श्री. सोमण, अतिरिक्त्‍ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनीही उपस्थित   विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर यथोचित मार्गदर्शन केले.

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक करताना सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. रेड्डी यांनी या उपक्रमाची संकल्पना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या कॉलेज नॉलेज व्हिलेज या धर्तीवर असून तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली व त्याला नूतन जिल्हाधिकारी श्रीमती. मुधोळ-मुंडे यांनी प्रत्यक्षात सुरुवात केली, असे सांगून  दि. 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत हे काम होणार असून यापूर्वी महालाभार्थी या वेबपोर्टल संदर्भात प्रशिक्षण घेतलेल्या 1 हजार  विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी स्वेच्छेने नोंदणी केली आहे.या विद्यार्थ्यांमधून कामाचे मूल्यमापन करून स्टुडंट ऑफ द वीक, ॲडमीन ऑफ द वीक अशा 24 अतिउत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. आठवड्यातून बुधवार व शनिवार असे दोन दिवस हे विद्यार्थी काम करतील,अशी माहिती दिली .

          या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडून  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर  https://osmanabad.gov.in/dip/  या U R L द्वारे डी.आय.पी च्या महत्वाच्या विषयाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता डी.आय.पी टीम व जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के.बी.कोंडेकर, पी.एन.रूक्मे व एन.आय.सी च्या टीम ने विशेष परिश्रम घेतले आहे.या लिंकचेही जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते डिजिटल उदघाटन करण्यात आले.
या उपक्रमाच्या उदघाटन सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तम सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी, याकरिता ध्वनिचित्रफितीद्वारे प्रोत्साहनात्मक,प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी आपल्या संदेशात उस्मानाबादच्या युवाशक्तीने सामाजिक जाणीव व जबाबदारीच्या उर्मीने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व उस्मानाबाद मधील युवाशक्तीकडे संपूर्ण समाज एक आदर्श म्हणून पाहील,अशा शुभेच्छाही दिल्या.
यावेळी बालाजी अमाईन्सचे श्री. बिराजदार,  श्री.मोरे ,स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री.अनिल पांडे , बँक ऑफ महाराष्ट्राचे श्री. पद्माकर तांबट, आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅग, टी-शर्ट, डायरी ,पेन,कॅप अशा प्रकारच्या विविध वस्तू दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे व आभार प्रदर्शन सीएम फेलो पल्लवी सांगळे व प्रियांका कारंडे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी आदित्य गोरे,जिल्हयातील विविध तालुक्यांतून आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, शासकीय यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी , महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.