रिपोर्टर: पाच दशकांपासून सिनेप्रेमींच्या मनात कायम राहिलेल्या, आजही सर्वांच्या ओठावर रूळलेल्या सदाबहार चित्रपट गीतांच्या मैफलीने उस्मानाबादकरांची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. निमित्त होते नववर्षानिमित्त वर्षाराणीज् एन्टरटेंमेन्ट प्रस्तुत ‘साल नया गीत पुराने’ या जुन्या गीत व गझल मैफलीचे. अनेक वर्षानंतर झालेल्या या बहारदार कार्यक्रमाला उस्मानाबादकर रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील समर्थनगर येथील मेघमल्हार सभागृहात नगर पालिकेचे गटनेते युवराज नळे आणि वर्षाराणी कुदळे यांच्या पुढाकारातून शनिवार, 19 जानेवारी रोजी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असताना कलेची जोपासना तितक्याच समर्पित भावनेने करत असलेल्या स्थानिक कलावंतांनी आपल्या गोड आवाजात प्रसिद्ध गायक मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, येशूदास यांच्यासह कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील गीतांचे लयबद्ध सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात सतीश अंबुरे, अॅड. दीपक पाटील, सारिका गायकवाड, युवराज नळे, वर्षाराणी कुदळे, सुजित अंबुरे, आक्कू पठाण, ऋषिकेश काटे, अभिषेक शेळके, अॅड. भारती रोकडे, अॅड. विद्युल्लता दलभंजन, अनिल घुले आदी कलाकारांनी सोलो, युगलगीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता किशोरकुमार यांच्या आवाजाने अजरामर झालेल्या ‘चलते चलते.. मेरे ये गीत याद रखना.. कभी अलविदा ना कहना..’ या गीताने झाली. कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांविषयीची पार्श्वभूमी विशद करत आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी बहारदार सुत्रसंचालन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
