
मंगळवारी होमप्रदीपन
मंगळवार, 15 जानेवारी रोजी होमप्रदीपन सोहळा आहे. सायंकाळी 5 वाजता हिरेहब्बू मठातून नंदीध्वज मिरवणूक निघेल. सोन्या मारुतीजवळील पसारे घराजवळ देवस्थानच्या पहिल्या नंदीध्वजाला सायंकाळी नागफणी बांधली जाणार आहे. रात्री दहा वाजता नंदीध्वज होम मैदानावरील होमकुंडाजवळ पोहोचल्यानंतर होमहवन आणि कुंभार कन्येच्या अग्निप्रवेशाचा धार्मिक कार्यक्रम हाणार आहे. होमकुंडास नंदीध्वजाच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर ते सिध्देश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतील. या दिवशीचा यंदा नागफणी पेलण्याचा मान सोमनाथ मेंगाणे यांना लाभला आहे. होमहवनानंतर भगिनी समाज परिसरात भाकणुकीचा कार्यक्रम आहे. देशमुखांच्या वासरास संपूर्ण दिवसभर उपाशी ठेवून रात्री वासरास गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी पिण्यास दिले जाते. वासराच्या खाण्यापिण्याच्या व मलमूत्राच्या आधारावरून पाऊस, पाणी, महागाई आदींबाबत भाकणूक केली जाईल.
बुधवारी शोभेचे दारुकाम
बुधवार, 16 जानेवारी रोजी होम मैदान येथे रात्री आठ वाजता शोभेच्या दारुकामाची आतषबाजी कार्यक्रम होतो. रात्री 10 वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 11 वाजता मानाचे सातही नंदीध्वज मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालतात.
गुरुवारी कप्पडकळी
गुरुवार, 17 रोजी उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये नंदीध्वजांच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर मल्लिकार्जुन पूजनाने नंदीध्वजांचे वस्त्र व आभूषणे विधिवत उतरविले जाऊन प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल.
सर्व समाजाला नंदीध्वजांचा मान
सिध्देश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असे सात नंदीध्वज असून सातही नंदीध्वज सिध्देश्वर देवस्थानच्या मालकीचे आहेत. पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी हिरेहब्बू असून दुसरा मान कसब्यातील देशमुखांचा, तिसरा मान लिंगायत - माळी समाजाचा, चौथा व पाचवा मान विश्वब्राम्हण, सहावा व सातवा मान मातंग समाजाचा आहे. ही यात्रा राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक आहे.
संस्कारभारती व कला
फाऊंडेशनच्यावतीने नंदीध्वज मिरवणूक मार्ग, सम्मती कट्टा, पसारे घर ते विजापूर वेशीपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालतात. 16 ते 20 जानेवारीदरम्यान कृषी प्रदर्शन होम मैदानावर भरते. होम मैदान आणि परिसरात मनोरंजनाचे विविध स्टॉल्स व पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. एकूण 40 सीसीटीव्हीच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष असणार आहे. सिध्देश्वर ध्यानमंदिराचे काम, सुवर्ण सिध्देश्वर मंदिराचे काम सुरु असून यात्रेचा विमाही उतरवण्यात येतो. रेवणसिध्देश्वर मंदिर परिसरातच यंदाही जनावरांचा बाजार भरणार आहे. अक्षता सोहळा एक वाजता पार पाडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मंदिर समिती व हिरेहब्बू यांच्यात समन्वय असल्याचेही काडादींनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी नारायण कुलकर्णी लिखित ‘श्री सिध्देश्वरांच्या अभंग गाथे’चे प्रकाशन काडादी यांच्या हस्ते करण्यात आले. लेखक बाळासाहेब जायभाय यांचे ‘काव्यामृत’, कवी राघंवाक यांचे ‘सिध्दरामेश्वरांचे महात्मे’, अॅड. रे.सि. पाटील लिखित ‘सिध्दरामेश्वर संक्षिप्त पुराण’ याची दुसरी आवृत्ती, संतोष पाटील यांचे ‘आनंदबोध’, सुनील वैद्य लिखित ‘द डिवायन सोल’ व कौलगुड व बडापुरे लिखित ‘दि ग्रेटनेस ऑफ सिध्देश्वर’ ही पुस्तके लवकरच येणार असल्याचेही काडादी यांनी सांगितले. यावेळी राजकुमार नष्टे, अॅड. रेवणसिध्द पाटील, सोमशेखर देशमुख, गुंडप्पा कारभारी, बाळासाहेब भोगडे, महेश अंदेली, अॅड. मिलिंद थोबडे, चिदानंज वनारोटे, विश्वनाथ लब्बा उपस्थित होते.