स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन:


रिपोर्टर:  स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत 'स्वच्छ सुंदर शौचालय' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  हि स्पर्धा राज्यस्तरीय असुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.संजय कोलते यांनी केले आहे.
     भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभर स्वच्छ सुंदर  शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात, त्यांना स्वच्छता  विषयी अभिमानास्पद स्वामित्वाची भावना निर्माण व्हावी, तसेच स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात हा आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या शौचालयला नव्याने रंग देऊन स्थानिक कलांच्या माध्यमातून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहून तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा लोगो काढणे अपेक्षित आहे. यामध्ये कुटुंबप्रमुखाने स्वनिधीतून शौचालय रंगविणे अपेक्षित आहे. तसेच जेथे शक्य आहे तेथे सीएसआर ची ही मदत घेतली जाऊ शकते. तसेच विविध शासकीय योजनेच्या समन्वयातून या स्पर्धेत ग्रामस्थांना जास्तीत जास्त सहभाग घेता येऊ शकतो. यासाठी सर्व संबंधित अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांनी यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले आहे.
    या स्पर्धेची औपचारिक सुरुवात दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्याचा नावलौकिकासाठी प्रयत्न करायचा आहे.  एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रंगवलेल्या शौचालयाच्या टक्केवारीनुसार राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जातील. हे तीन जिल्हे त्या-त्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती निवडणार  आहेत. ज्यांनी कल्पकतेने शौचालय रंगविलेला असेल त्या पाच ग्रामपंचायतमधील छायाचित्र राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या फोटो आणि माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरासाठी राज्यस्तरावर नामनिर्देशन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2019 आहे त्यामुळे जिल्ह्याकडून रंगविलेले छायाचित्राची गावनिहाय तालुकानिहाय छायाचित्रासह माहिती दिनांक 30 जानेवारी 2019 पर्यंत पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेकडे पाठविणे आवश्यक आहे. याची निवड राष्ट्रीय स्तरावर पाणी व स्वच्छता मंत्रालयाने गठीत केलेल्या समितीकडून होईल.  सामाजिक माध्यमामध्ये याची प्रसिद्धी देताना #Myizzarghar या संकेताचा उपयोग करायचा आहे.