रिपोर्टर: उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे कौतूकास्पद नियोजन केल्याबद्दल सरस भारत अकादमीच्यावतीने आयोजन समितीचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद शहराच्या सामाजिक तसेच आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत सातत्य राखणार असल्याची ग्वाही आयोजन समितीच्यावतीने देण्यात आली.
उस्मानाबाद शहरात पहिल्यांदाच हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार, 23 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याला वयवर्षे 10 ते 86 वर्षे वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यात महिलांनी नोंदविलेला सहभाग वाखानण्याजोगा होता. सलग महिनाभर या स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तीत सुरू होते. त्यामुळे देश आणि राज्य पातळीवरील नामांकित धावपटूंनी देखील यात सहभाग नोंदविला होता. उस्मानाबादच्या रस्त्यांवरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे धावपटू स्पर्धेच्या निमित्ताने धावताना उस्मानाबादकरांना पाहण्यास मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठी प्रेरणा आणि उर्जा मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हाफ मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीचे सदस्य प्रा. रवी शितोळे, चित्रसेन राजेनिंबाळकर, प्रदीप खामकर, अमोल माने, चंदन भडंगे, रोहन घुटे, कुणाल गांधी, सुरज कदम, रणजित रणदिवे, नितीन तानवडे, गणेश रणखांब यांचा सरस भारत अकादमीच्यावतीने मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सरस भारत अकादमीचे डॉ. धीरज वीर, सुनील बडुरकर, प्रशांत पाटील, रोहित बागल, माधव इंगळे, प्रा. रवी निंबाळकर, प्रा. वैजीनाथ खोसे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी प्रास्ताविक राज ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर तर आभार अग्निवेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धेत सहभागी झालेले धावपटूही उपस्थित होते.