कुर्डूवाडी-उस्मानाबाद-लातूर रेल्वेमार्गाचे दीड वर्षात विद्युतीकरण रेल्वे महाप्रबंधकांच्या पथकाकडून उस्मानाबाद स्थानकाची पहाणी:




उस्मानाबाद,  सध्या लातूर ते कुर्डूवाडी या दरम्यान डिझेल इंधनावर रेल्वेगाड्या धावतात. उस्मानाबादहून ये-जा करणार्‍या गाड्यांची संख्या वाढण्यासाठी येत्या दीड वर्षात कुर्डूवाडी-उस्मानाबाद ते पुढे लातूरपर्यंत रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई येथील रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, मुख्य वाणिज्य प्रबंधक शैलेंद्र कुमार, विभागीय रेल प्रबंधक सोलापूर हितेंद्र मल्होत्रा यांच्यासह शंभरावर अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी उस्मानाबाद रेल्वेस्थानकास भेट देऊन येथील प्लॅटफार्म, पाण्याची सुविधा, स्वच्छता, प्रवाशांच्या विश्रांती कक्षात जावून सोयी-सुविधांची पाहणी केली.
कुर्डूवाडी-उस्मानाबाद-लातूर या मार्गावर गाड्या वाढविण्याबाबत पत्रकारांनी मुद्दा उपस्थित केला असता, दीड वर्षात विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर आपण आवश्यक तेवढ्या गाड्यांची संख्या वाढू शकतो. कुर्डूवाडी-लातूर या रेल्वेगाडीचा वेगही वाढविण्यात येणार आहे. सध्या ही रेल्वेगाडी तासी 90 किमी वेगाने धावते आहे. डिसेंबरमध्ये ही रेल्वेगाडी तासी 110 किलोमीटर वेगाने धावेल, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे प्रवाशांचा प्रवास पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगावान होऊन वेळेचीही बचत होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री यांच्यासह प्रवाशांनीही महाप्रबंधक शर्मा यांच्यापुढे काही गरजा मांडल्या. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी 25 ऑक्टोबर रोजी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी स्वच्छतेसह विविध असुविधांवरून अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. शुक्रवारी महाप्रबंधक शर्मा रेल्वेस्थानकाच्या तपासणीसाठी आले असता, स्थानक चकाचक केले होते. पाणी, स्वच्छता, पाकिर्र्ंग आदी बाबींची दक्षता घेतल्याचे पहावयास मिळाले. रेल्वेमार्ग उभारणीकरीता आवश्यक प्रक्रीयेकरीता किती निधी मंजूर झाला ? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर महाप्रबंधक शर्मा यांनी याबाबतचा निधी मागणीचा प्रस्ताव अद्याप रेल्वेमंत्रालयाकडे सादर झाला नसल्याचे सांगितले. तसेच हा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल, येणार्‍या अर्थसंकल्पात याबाबत निधीची तरतूदही होईल, असे त्यांनी सांगितले.


डिसेंबरपासून लातूर-कुर्डूवाडीची गती 110 वर
कुर्डूवाडी-उस्मानाबाद ते लातूर या रेल्वेमार्गावर धावणार्‍या रेल्वेगाड्यांना सध्या प्रतितास 90 किलोमीटर अशी वेगमर्यादा घालण्यात आली आहे. रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीचे सध्या काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होताच वेगमर्यादा डिसेंबर 2018 मध्ये वाढविण्यास मंजूरी दिली असून या मार्गावरील रेल्वेगाड्या डिसेंबरपासून तासी 110 किलोमीटर वेगाने धावतील. यामुळे प्रवासाच्या वेळेत आणखी बचत होणार आहे.

रेल्वे उपभोक्ता समितीचे निवेदन
रेल्वे महाप्रबंधक शर्मा यांना उस्मानाबाद येथील रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात स्थानकावरील निवारा शेडची लांबी वाढवावी, कोच इंडिकेटस बसविण्यात यावेत, गुडस रॅक पाँइंट, व्हायफाय सुविधा द्यावी, शहरातील आरक्षण केंद्राची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत करावी, मुंबईसह पुणे, हैदराबाद, तिरुपतीकरीता स्वतंत्र नवीन रेल्वेगाड्या सोडाव्यात आदी मागण्या केल्या.