श्रीक्षेत्र रामलिंग मंदिराला आता सोनेरी कळसाची झळाळी

उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी कलशारोहण

रिपोर्टर:उस्मानाबाद तालुक्यातील श्रीक्षेत्र येडशी येथील ग्रामदैवत रामलिंग मंदिराचा कळस आता सोनेरी झळाळीने चकाकणार आहे. उद्योजक देवदत्त मोरे यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या शिखरावर शुक्रवार, 2 नोव्हेंबर रोजी सोन्याचा मुलामा असलेल्या कलशाचा कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते पार पडणार्‍या कलशारोहण कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंदीर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

येडशी येथे देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने विविध सामाजिक विकासाची कामे करण्यात आली आहेत. येडशी गावात 50 लाख रूपये खर्चून लिंगायत समाजासाठी समाजमंदीर, मुस्लिम समाजाच्या दफणभूमीचा प्रश्न, वारकरी सांप्रदायास आर्थिक मदत, निराधार, एकल महिलांना शिलाई यंत्राचे वाटप, अपंगांना सायकलींचे वाटप, असे विविध सामाजिक कामे मोरे यांनी केली आहेत.

मराठवाड्यासह राज्यभरातून श्रीक्षेत्र येडशी येथील रामलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. या मंदिराच्या शिखराचे बांधकाम देवदत्त मोरे यांच्यावतीने करण्यात आले. निसर्गरम्य आणि अभयारण्यात असलेल्या या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा असलेला कलश सवार्ंचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजता देवदत्त मोरे यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची मंदिर समितीकडून जोरदार तयारी सुरू असून भाविकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समिती व देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.