उस्मानाबाद, रिपोर्टर: मोठमोठ्या घोषणा देवून सत्तेवर आलेले हे सरकार शेतकर्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. या आत्महत्यांना आमदार, खासदार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप करीत बळीराजाचा विश्वासघात करणार्या सरकारचा बदला घेतल्याखेरीज आपण स्वस्त बसणार नाही, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टिका केली.
उस्मानाबाद येथे देवदत्त मोरे फौंडेशन आणि शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हास्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन युवा उद्योजक तथा कार्यक्रमाचे आयोजन देवदत्त मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे कालीदास आपेट, प्रशांत भालशंकर, शिवाजी नांदखिले, पांडूरंग रायते, ललीत खडके, पांडूरंग मारवाडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या राज्यात शेतकरी संघटनेचे पीक फुटले आहे. संघटना उदंड झाल्या आहेत. अशा काळात आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळ शब्द समाविष्ठ करावा यासाठी लढा देणार्या संघटनेला देवदत्त मोरे यांनी दिलेले समर्थन कौतूकास्पद असल्याचेही पाटील यांनी सांगितले. दरवर्षी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, पंकजा मुंडे स्वतःचे मेळावे आयोजित करतात. यात ते शेतकरी आत्महत्त्येवर अजिबात चर्चा करीत नाहीत. त्याऐवजी त्यांना जातीपातीचा आणि धर्माचा मुद्दा अधिक प्रिय वाटतो. हे मेळावे घेणारे सर्वजण शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. शेती व्यवस्थेला राजकारणामुळे ग्रहण लागले आहे आणि ते पुसून टाकण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी देवदत्त मोरे यांच्यासारख्या सद्गुणी माणसांना पाठबळ द्यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
आपला जन्म शेतकर्याच्या कुटूंबात झाला. त्यामुळे शेतकर्यांच्या व्यथा आपण जवळून अनुभवल्या आहेत. पिढ्यान्पिढ्या भोळ्या शेतकर्याची फसवणूक करून राजकीय पुढारी आपल्या तुंबड्या भरीत आहेत. त्यामुळे आता शेतकर्यांनी स्वतःच्या आक्रोशाचा आसूड उगारायला हवा. अशा शब्दात देवदत्त मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील काळात दुष्काळी परिस्थिती आणि जिल्ह्यातील नापिकीमुळे वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा यासाठी आपण प्राधान्याने काम करणार आहोत. शेतकरी बांधवांच्या चळवळीला बळ देण्यासाठी तनमनधनाने आपण त्यांच्यासोबत उभे असल्याचे मोरे यांनी यावेळी नमूद केले. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला जिल्हाभरातील शेतकर्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी आभारही मानले.
यावेळी कालीदास आपेट, प्रशांत भालशंकर, प्रा. जगदीश गवळी, शिवाजी नांदखिले, पांडूरंग रायते, मिलींद रोकडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक अरविंद घोडके यांनी तर शेवटी आभार गोपाळ उबाळे यांनी मानले.
आसूड उगारून परिषदेचे उद्घाटन
शेतकरी आत्महत्त्येचा जिल्ह्यावर असलेला कलंक पुसून टाकण्यासाठी यावेळी उपस्थित शेतकर्यांनी जाहीर शपथ घेतली. सुरूवातीला मंचावरील सर्व मान्यवरांना शेतकर्यांचा आसूड हातात देवून सन्मानित करण्यात आले. मंचावर उपस्थित सर्वांनी शेती आणि शेतीच्या वाट्याला आलेल्या मानवनिर्मित तसेच नैसर्गिक समस्यांवर प्रतिकात्मक रूपाने हा आसूड उगारून परिषदेचे उद्घाटन केले.