
रिपोर्टर: विकास उबाळे उस्मानाबाद, येथे दि 26 रोजी देवदत्त मोरे फाऊंडेशन च्या वतीने दुष्काळी परिषद आयोजित केली आहे यामध्ये सर्व प्रकारच्या शेती मालावरील निर्यातबंदी कायमची उठवावी, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था छावणीऐवजी दावणीला करण्यात यावी, यांसह विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी देवदत्त मोरे फाऊंडेशन व शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी उस्मानाबादेत भव्य शेतकरी मेळावा व दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तर उद्घाटक प्रसिध्द उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शुक्रवार,दि 26 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळावा व दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांचे सरसकट संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलातून मुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाच्या फरकाची रक्कम , उसासाठी साडेतीन हजार रूपयांची पहिली उचल या प्रमुख मागण्या या परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात येणार आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दुष्काळी परिषदेला कालीदास आपेट, ललीताताई खडके, पांडूरंग मारवाडकर, विमलताई आकणगिरे, औदूंबर धोंगडे, अरविंद घोडके, हनुमंत वीर, शिवाजी नांदखिले, पांडूरंग रायते, धनंजय जोशी, चंद्रकांत भराटे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची तीव्रता दाहक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांच्यावर सध्या अत्यंत बिकट वेळ आली आहे. पशुधनाचा प्रश्न त्याहून गंभीर बनला आहे. अशावेळी या दाहक परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष देवून बळीराजाला दिलासा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हाभरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवदत्त मोरे फाऊंडेशनच्या वतीने उद्योजक देवदत्त मोरे यांनी केले आहे.