पालकमंत्री यांनी केली बाळापूर तालुक्याची पीक पाहणी
अकोला :रिपोर्टर:दोन पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे जमिनीतील आर्द्रता कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूरसह विविध पिकांचे उत्पन्न कमी होणार आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी शासन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
मागील काही दिवसांपासून पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन पिकांची पाहणी करत आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली असल्याचे दिसून येते. तसेच जमिनीला भेगा पडल्यामुळे शेतात तग धरून असलेल्या पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे.
आज दि. 22 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी बाळापूर तालुक्यातील निमकर्दा, मोरगाव सादीजन, अंदूरा आदी गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, बाळापुरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार दीपक पुंडे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री.कंडारकर, तालुका कृषि अधिकारी श्री.जांभळूणकर आदींची उपस्थिती होती.
निमकर्दा येथील अरूण बळीराम जामोदे यांच्या शेतातील तूर पाणी नसल्यामुळे उत्पादन कमी येणार आहे. अशीच परिस्थिती निमकर्दा मंडळामधील इतर शेतातील आहे. तसेच पावसाच्या दोन पाण्यात खंड पडल्यामुळे सोयाबीनचे अत्यंत कमी म्हणजेच एकरी दीड क्विंटल झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सोयाबीन, तूर कपाशी आदी पिकांचे उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकऱ्यांनी श्री.पाटील यांना सांगितले. निमकर्दा येथील रितेश व प्रवीण वसंतराव गव्हाणकर यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांवर लाल्या रोग आला आहे. पाणी कमी असल्यामुळे उत्पन्नात कमी येणार आहे. याच प्रकारची परिस्थिती कसूरा, अडोशी-पडोशी आदी गावातील शेतात दिसून येते.
मोरगाव सादीजन येथील मासूमशाह मेहबुबशाह यांच्या शेतातील कापसाचे पीक पाण्यात आर्द्रता नसल्यामुळे कापसाची पाने सुकलेली आहेत. तसेच पराटीचे झाडे फुलासह बोंड न फुटता मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती पाऊस कमी पडल्यामुळे व उन्हामुळे बाष्पीभवन झाल्यामुळे जमिनीतील आर्द्रता कमी होऊन उत्पादनात कमी येत असल्याचे निर्दशनात आले. अंदूरा येथील संजय घंगाळे यांच्या शेतातील कपाशीचे पीक पाणी नसल्यामुळे एकरी 50 ते 60 किलो उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे श्री. घंगाळे यांनी सांगितले त्यांच्या शेतातील पराटीचे पाने पावसाअभावी कोमेजून गेली आहेत.
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कागदपत्रे नोंदीनुसार नाही तर प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे अहवाल एकत्रित अहवाल पाठविणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांना प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगितले. केंद्र व राज्यशासन दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नियमानुसार जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री रणजीत पाटील यांनी निकमर्दा येथील पाझर तलावाच्या खोलीकरणाची पाहणी केली. सदर पाझर तलाव 14 एकर एरियामध्ये पसरलेला आहे. या तलावाचे खोलीकरण व विस्तारीकरण केल्याने निमकर्दा भागातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. तसेच या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळे या कामाला प्राधान्य द्यावे असे निर्देश पालकमंत्री डॉ.पाटील यांनी कृषि व महसूल विभागाला दिले.
बाळापूर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तेल्हारा तालुक्यातील अडसूळ, उमरी, नेर, पंचगव्हाण, सांगवी हिवरे आदी गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. तेल्हारा तालुक्यात दोन पावसात खंड पडल्यामुळे व अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. या सर्वांचा एकत्रित अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे तसेच मा. मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांना प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.