राष्ट्रवादीने विचारला पालकमंत्र्यांना जाब उस्मानाबाद लोहारा तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना केंव्हा देणार न्याय..??



 पिकांचे चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार- राणाजगजीतसिंह पाटील

रिपोर्टर....पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन ४८ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पाळले नाही. शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतही कसलीच कार्यवाही दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्याबाबत एवढी दिरंगाई का होत आहे ? असा संतप्त जाब आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री खोतकर यांना विचारला आहे. येत्या २६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मंत्र्यांना बंदी करण्याच्या निर्णयावर ठाम रहात त्यापूर्वी हा प्रश्न मार्गी न लागल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.17 सप्टेबर रोजी  मराठवाडा मुक्ति दिनाचे पावित्र्य राखण्यासाठी मंत्र्यांना बंदी करण्याचा निर्णय स्थगित करत जाब विचारण्यात आला.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पीक विम्यापासून वंचित राहावे लागले. पीक कापणी प्रयोगात मंडळ घटक गृहीत धरण्याऐवजी तालुका घटक घेतल्याने ७५००० शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सलग सहा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरणे आंदोलनही करण्यात आले होते.

आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी देखील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळे कृषिमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन नागपूर कृषी मंत्र्यांच्या दालनात दि.१३ जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांवर झालेला अन्याय लक्षात घेवून कृषिमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी आठ दिवसात मदत व पुनर्वसन विभागाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करतो, असे आश्वासन या बैठकीमध्ये दिले होते.

घोषणा होऊन 8  दिवस उलटून गेले तरी त्याबाबत कांही कारवाई होत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आपणास आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दि.१९/७/२०१८ रोजी पत्र लिहून उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळावी, त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा व मदत व पुनर्वसन मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत शासनाची भूमिका दि.२२/७/ २०१८ जाहीर करावी व निधी वितरित होण्याची तारीख जाहीर करावी अशी मागणी केली होती.

परंतु तरी देखील याबाबत कोणत्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही झाली नसल्याने पालकमंत्री अर्जुन खोतकर ३० जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने त्यांना घेराव घालून वरील सर्व बाबी अवगत करून तातडीने पिकविम्याचे पैसे देण्याबाबत पुन्हा एकदा आग्रही मागणी केली होती.

त्यावर पालकमंत्री खोतकर यांनी येत्या दोन दिवसात विमा कंपनीवर दबाव आणून हा प्रश्न मार्गी लावू, तसे झाले नाही तर सरकार ही रक्कम देईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही यात काहीच सुधारणा न झाल्याने आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहणानंतर थेट जाब विचारला.

त्यावर खोतकर यांनी मदत व पूनर्वसन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी तात्काळ संपर्क करून आपल्या भावना त्यांना कळवतो व येत्या २६ सप्टेंबर रोजी याबाबत बैठक आयोजित केली असून त्यात आपल्या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली.

आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी खरीप हंगाम २०१८ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाळ्यातील १०८ दिवसांपैकी ८२  दिवस कोरडे गेले असून पावसाचा खंड फार मोठा पडला असल्याने सोयाबीन पिकांचे ५०% अधिक नुकसान झाले आहे असून अवर्षनाने हाती आलेली पिके वाया गेली असल्याचे पालकमंत्री यांना अवगत केले.दि.१० ऑगस्ट रोजी पावसाचा ३० दिवसांहून अधिकचा खंड पडल्याने व सरासरीच्या केवळ ३५% पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकऱ्यांना विमा नुकसानीपोटी २५% अग्रीम देण्याची मागणी केली होती.परंतु त्याबाबत प्रशासनाकडून कसलीच हालचाल झालेली नाही.

यावेळी उपस्थित जिल्हा कृषी अधिक्षकांना त्यांनी सादर केलेल्या नुकसानीचा अहवाल मागितला असता त्यांनी पावसाच्या खंडाने केवळ २५% नुकसान झाल्याचे सांगितले.तसेच आम्ही हा अहवाल प्रत्यक्ष शेतात जाऊन बनवत नसतो तर कृषी सेवक फोनद्वारे शेतकऱ्यांकडून माहिती घेतात व त्यामाहितीवर आधारित जिल्हा कृषी अधीक्षक यांचा अहवाल सरकारकडे सादर केला जातो अशी माहिती दिली.

अतिशय भीषण अशी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना सर्व पिके जवळपास गेल्यात जमा असताना कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा गेल्या खरिपात जी चूक केली तीच चूक यावेळी देखील केल्याचे दिसून आल्याने आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी वारंवार चुकीच्या पद्धतीने पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी या दोन मुद्द्यांसह इंधन दरवाढ नियंत्रनात आणण्यासाठी उपाययोजना करावी तसेच वीज दरात प्रस्तावित असलेली १५% दरवाढ रद्द करावी अशी देखील मागणी पालकमंत्र्यांना करण्यात आली.

पालकमंत्री कळंब तालुक्याच्या दौऱ्यावर असताना शेकडोंच्या संख्येने संतप्त शेतकऱ्यांनी ढोकी, डिकसळ,देवळाली व खोंदला येथे पीक परिस्थितीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व किमान यावेळी तरी वस्तुनिष्ठ पंचनामे व्हावेत व वेळेत योग्य ती मदत मिळावी अशी मागणी केली.

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,जेष्ठ नेते जीवनराव गोरे, अमोल भैय्या पाटोदेकर, मसूद शेख, तालुकाध्यक्ष गफार काझी,पं.स.सभापती बालाजी गावडे, उपसभापती शामभैय्या जाधव, अरुणपापा वीर, उद्धव पाटील, सतीष दंडनाईक, भारत डोलारे, राहुल पाटील सास्तूरकर, शिवदास कांबळे, तारेख मिर्जा, इलियास पिरजादे, किशोर साठे, सुनील काकडे, संपतराव डोके, राजसिंह राजेनिंबाळकर, अनंतराव देशमुख, निहाल काझी, शिवाजीराव देशमुख, झुंबर बोडके, नाना कदम, दत्ता देशमुख, विराट पाटील, आशिष नायकल, बाजीराव पवार, शाम तेरकर, प्रमोद देशमुख, अभय इंगळे, माणिक बनसोडे, गणेश खोचरे, कल्याण पवार, बापू पवार, बारीसाहेब काझी, प्रल्हाद धत्तुरे, रामचंद्र पाटील, मदन बारकूल, नाना वाघ, संजयकाका लोखंडे, नागाप्पा पवार, बाळासाहेब घुटे, ऍड. आंबेकर, पांडुरंग लाटे, चंद्रकांत काकडे, जीवन बरडे, गफूर शेख,बबलू शेख, वाजिद पठाण, अन्वर शेख, विलास लोंढे, विलास रसाळ, रमण जाधव, अमोल सुरवसे, अमोल राजेनिंबाळकर, सुनील शेडगे, अनिल शिंदे, मुकुंद सोकांडे, गणेश एडके, रमजान तांबोळी यांच्यासह उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म.न.से. ने देखील यास जाहीर पाठिंबा दिला असून जिल्हा सचिव दादा कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यावेळी सोबत होते.