बेंबळीतील बाराशे गणेशमूर्तीं, निर्माल्याचे संकलन

ग्रामसेवा ग्रुपच्या उपक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद
उस्मानाबाद, तालुक्यातील बेंबळी येथे मागील दीड वर्षापासून विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्‍या ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने रविवारी बाराशे घरगुती श्रीगणेशमूतीर्र् व निर्माल्याचे संकलन करण्यात आले. दिवसभर जमा झालेल्या सर्व श्रींच्या मूर्तींचे यथोचित विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अशा पध्दतीचा उपक्रम राबविणारे गाव म्हणून बेंबळी गावाची नवी ओळख निर्माण झाली आहे.
मागील वर्षी व यंदा बेंबळीसह परिसरात जेमतेम पाऊस झाल्याने नदी, नाले व विहिरींमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने ग्रामस्थांकडून घरी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्ती विसर्जनदिनी अत्यल्प पाण्यात, गटारयुक्त पाण्यात विसर्जित करतेवेळी नकळत होणारी विटंबना थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मल्लिाकार्जुन मंदीर येथे मूर्ती संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत बाराशे कुटूंबांनी आपल्या श्रींच्या मूर्ती ग्रुपच्या स्वाधीन केल्या. दिवसभर संकलित झालेल्या सर्व मूर्तींचे उमरेगव्हाण शिवारातील मोठ्या खणीतील पाण्यात यथोचित विसर्जित करण्यात आल्या. 

गावातून आवाहन फेरी
रविवारी ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने विविध मार्गावरून फेरी काढून गणेश मंडळ व ग्रामस्थांना नदी, नाल्यातील पाण्याच्या कमतरतेमुळे योग्यरितीने गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रावर आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बाराशे कुटूंबांनी आपल्या घरातील श्रींच्या मूर्ती ग्रामसेवा ग्रुपच्या स्वाधीन केल्या. रात्री 10 पर्यंत जमा झालेल्या बाराशे गणेशमूर्तींचे यथोचित विसर्जन करण्यात आले. गणेश मंडळांच्या रथातील लहान-मोठ्या मूर्ती मंडळांनी अन्य ठिकाणी विसर्जित केल्या.