रिपोर्टर..जयसिंगपूर
राज्य सरकारच्या लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत चार एकर जमिनीत पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेताना तलाठी सदाशिव धोंडिराम निकम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री ८.१५ सुमारास निकम याच्या निवासस्थानी पथकाने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी, राज्य सरकारची लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत चार एकर जमिनीत तेजपाल साजणे यांच्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावण्यासाठी निकम यांनी ५० हजार रूपयांची मागणी केली होती. यासाठी प्रसंगी तहसिलदार, मंडल अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून सदरचे काम आपण मार्गी लावू, असेही निकम यांनी सांगितले होते.
दरम्यान, शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली होती. सायंकाळी तलाठी निकम यांनी तक्रारदार साजणे यांना आपल्या घरी रक्कम घेऊन बोलाविले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. साजणे यांच्याकडून रक्कम स्विकारताना पथकाने निकम यास रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर जयसिंगपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.