नांदेड येथील एक जिल्हा न्यायाधीश पाठवला सक्तीच्या सेवानिवृत्तीवर उच्च न्यायालयाचे आदेश... अनेकांची नावे असण्याची शक्यता

नांदेड रिपोर्टर..- नांदेड येथील पहिले जिल्हा न्यायाधीश ए.जी.मोहाबे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज नांदेडचे जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांनी सक्तीच्या सेवानिवृत्तीवर रवाना केले आहे.

काहीच दिवसांपूर्वी निफाड जि.नाशिक येथील जिल्हा न्यायाधीश ए.जी.मोहाबे यांची बदली नांदेडचे पहिले जिल्हा न्यायाधीश या पदावर झाली. नांदेडमध्ये या थोड्याशा दिवसांमध्ये त्यांनी बऱ्याच खटल्यांचा निर्णय दिला. सन 2009 मध्ये एका दिड वर्षाच्या बालकाची हत्या झाली होती त्या खटल्याचा निकाल सुध्दा तब्बल नऊ वर्षानंतर ए.जी.मोहाबे यांनीच दिला होता. 6 वर्षापूर्वी ते नांदेडच्या कामगार न्यायालयात कार्यरत होते. आज दुपारी एक वाजता नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांनी आपल्या कक्षातून उठून पहिले जिल्हा न्यायाधीश ए.जी.मोहाबे यांच्या कक्षात गेले. न्यायपिठावर असलेल्या ए.जी.मोहाबे यांना मध्ये खासगी कक्षात बोलावून त्यांना उच्च न्यायालयाचा आदेश सांगण्यात आला. त्वरितच त्यांना आपले सर्व खासगी साहित्य घेवून सुरक्षा रक्षक आणि एक सेवक यांच्यासह घरी रवाना करण्यात आले. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या सत्रानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांनी इतर सर्व जिल्हा न्यायाधिशांची एक बैठक बोलाविली होती. त्या बैठकीतील सविस्तर माहिती कळू शकली नाही. सोबतच ए.जी.मोहाबे यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीवर का पाठविले याचीही माहिती मिळाली नाही.

प्राप्त माहितीनुसार उच्च न्यायालयाने अनेक जिल्हा न्यायाधिशांना अशा प्रकारे सेवेतून कमी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये कार्यरत असलेल्या एका जिल्हा न्यायाधिशांची बदली मुंबई येथे झाली होती. त्यांनाही अशाच प्रकारचा आदेश बजावला असल्याची माहिती मिळाली आहे. पण सोबतच नांदेड जिल्ह्यातील आणखी एका न्यायाधिशाचे नाव या सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या यादीत असल्याची चर्चा न्यायालय परिसरात होती, पण ते जिल्हा न्यायाधीश मागील बऱ्याच दिवसांपासून रजेवर असल्यामुळे त्यांच्यावर हा आदेश पारित झाला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.