मुंबई रिपोर्टर..- सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी मंडप व प्रवेशद्वार उभारणी करण्याकरिता आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पोलीस ना हरकत प्रमाणपत्रासाठी तो अर्ज परस्पर पोलीस व वाहतूक पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे. अर्जदारांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याने त्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, आधार क्रमांक आदी तपशील नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित मंडळांचे अध्यक्ष व सचिव यांचा तपशील देणेही आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा धर्मदाय आयुक्त यांच्याकडील नोंदणी क्रमांक असल्यास त्याची माहिती, मंडळाचा अधिकृत पत्ता, गणेशोत्सव साजरा करावयाचा जागेचा नकाशा, जागेची छायाचित्रे आदी तपशील देखील ऑनलाईन अर्ज प्रक्रिये दरम्यान अपलोड करता येणार आहे. सहाय्यक अभियंता (परिरक्षण) यांनी ऑनलाईन अर्जाची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर हा अर्ज स्वयंचलित पद्धतीने मुंबई पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईत सार्वजनिक उत्सवांदरम्यान सार्वजनिक जागी मंडप, प्रवेशद्वार उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. पूर्वी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात स्वतः जाऊन अर्ज द्यावा लागत असे. हा अर्ज सादर करताना त्यासोबत मुंबई पोलिसांचे व वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र देखील घ्यावे लागत असे. यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात व वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात देखील स्वतःच जावे लागत असे. या बाबी लक्षात घेऊन नागरिकांच्या सुलभतेसाठी व ईज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत बृहन्मुंबई महापालिकेने पुढाकार घेत ही सर्व प्रक्रिया महापालिकेच्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिली आहे.