इंग्रजी शाळांचे तीनशे विद्यार्थी मराठी शाळांत दाखल.


_____________

 रिपोर्टर....अकोले तालुक्यातील विविध इंग्रजी शाळांमधून सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच अनुदानित माध्यमिक शाळांचाही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये समावेश आहे. इंग्रजी शाळांबद्दल भ्रमनिरास झाल्यामुळे म्हणा अथवा मराठी शाळांची शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेली धडपड पाहून म्हणा, मोठय़ा अपेक्षेने  पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल केले आहे.तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या सोळा शाळा आहेत. काही शाळांमध्ये दहावीपर्यंत तर काही शाळांमध्ये सातवीपर्यंत वर्ग आहेत. सर्वत्रच असणारे इंग्रजी शाळांचे लोण तालुक्यातही पसरल्यानंतर खेडय़ापाडय़ातही या शाळा सुरूझाल्या, पण पायाभूत सुविधांचा अभाव, मराठी माध्यमातून स्वत: शिक्षण घेतलेले, पण आता इंग्रजी माध्यमात शिकवत असलेले बहुसंख्य शिक्षक, प्रशिक्षणाचा अभाव तसेच वाढता खर्च आदी विविध कारणांमुळे पालकांचा या शाळांबाबत भ्रमनिरास होऊ  लागला आहे. त्यातच अकोले तालुक्यात या वर्षी काही शिक्षणप्रेमी नागरिक, आजी-माजी शिक्षक यांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे कसे योग्य आहे या संदर्भात मराठी शाळा- माझी शाळा ही मोहीम राबवली. त्यामुळे इंग्रजी शाळांमधून मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यातील बहुसंख्य प्रवेश पहिलीच्या वर्गात आणि काही पाचवीच्या वर्गात झाले असले तरी अन्य इयत्तांमध्येही कमीअधिक प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३८९ प्राथमिक शाळा आहेत. एक अनुदानित प्राथमिक शाळा असून बऱ्याच माध्यमिक शाळांमध्ये पाचवी पासूनचे वर्गही आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आजपर्यंत १२० विद्यार्थी इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत अर्थात, ही संख्या दोनशे सव्वादोनशेपर्यंत वाढू शकेल असे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात विविध शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी तपासता ही संख्या ३०० पेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.
फ्लेक्सच्या माध्यमातून जाहिराती
....खेडय़ापाडय़ातील शाळा देखील आपली वैशिष्टय़े सांगणाऱ्या जाहिराती फ्लेक्सच्या माध्यमातून करू लागल्या आहेत. शिवाय या शाळेतील शिक्षकांनाही बदलत्या परिस्थितीची जाणीव होऊ  लागली आहे. गुणवत्ता टिकवली तरच शाळा टिकतील या गोष्टीची त्यांना जाणीव आहे. तालुक्यात २८९ पैकी १२४ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. यावरून या शाळांची सद्य:स्थिती लक्षात येऊ  शकते, मात्र शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांकडून सुरू असणारे विविध प्रयत्न, ते राबवत असणारे विविध उपक्रम, पालकांशी वाढता संपर्क आणि मातृभाषेतून शिक्षणाचे पालकांना उमगू लागलेले महत्त्व या सर्वामुळे पालकांचा कल आता मराठी शाळांकडे वाढू लागला आहे. मातृभाषेतून शिकत असतानाही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता येते हा अनुभव विद्यार्थ्यांना, पालकांना आला तर मराठी शाळांना पुन्हा पूर्वीसारखे सुगीचे दिवस येऊ शकतील.