१६ जुलै पासून मुंबईसह राज्यातील दुध पुरवठा बंद.


____________

रिपोर्टर ..... .सध्या राज्यात दररोज एक कोटी ३४ लाख लिटर्स दुधाचे उत्पादन होत असून राज्याच्या दुधाची मागणी मात्र ९७ लाख लिटर आहे. त्यामुळे उर्वरित ४० लाख लिटर दुधाचे करायचे काय? असाप्रश्न निर्माण झाला असून सद्या दुधास केवळ १७ रुपये भाव मिळत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात सरकार मात्र कोणतीही ठोस भुमिका घेण्यास तयार नाही. तेव्हा दुध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधास गुजरात, कर्नाटक व केरळ राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही प्रतिलिटर पाच रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठीयेत्या १६ जुलै पासून मुंबई व राज्यातील इतर शहराचा दुध पुरवठा बंद करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. राज्यातील दुधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. एका बाजूला शासनाने दुध भुकटीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी कांहीही पडणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे दुध भुकटी तयार करणाऱ्या दुध संघाचे उखळ पांढरे होणार आहे. किंबहुना भुकटी तयार करणाऱ्या संघाच्या दबावामुळेच शासनाने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप करुन तुपकर पुढे म्हणाले की, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. शिवाय याच मागणीसाठी २९ जून रोजी पुण्यामध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भव्य मोर्चाही काढण्यात आला होता. तरीही सरकारने याची दखल घेतली नाही. या सरकारला शांततेची भाषा समजत नाही. शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी गुजरात, कर्नाटक तसेच केरळ राज्याने शेतकऱ्याच्या दुधास प्रतिलिटर कांही अनुदान जाहिर केले आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी व त्यांच्या दुधास योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनानेही प्रतिलिटर दुधास पाच रुपये अनुदान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी दिनांक १६ जुलै पासून दुध बंद आंदोलन करण्यात येणार असून शेतकऱ्याच्या दुधास अनुदान मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात आम्ही दुध जावू देणार नाही,असे सांगून सरकारने जर पोलिस संरक्षणात दुध नेण्याचा प्रयत्न केल्यास आमचे दुध उत्पादक शेतकरी कायदा हातात घेवून शासनास जशास तसे उत्तर देतील असेही त्यांनी स्पष्ट केले.१६ जुलै पासून सुरु होणाऱ्या या आंदोलनास गुजरात मधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्यासह महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी दिला असल्याचे सांगून मराठवाड्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. याप्रसंगी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, कार्याध्यक्ष गोरख भोरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे व महिला जिल्हाध्यक्ष सोनाली शिंदे यांची उपस्थिती होती.