मोठी बातमी: मंत्रालय मुंबईबाहेर हलवणार





रिपोर्टर....- मुंबई शहरातील वाढती गर्दी व भविष्यातील ताण लक्षात घेऊन मुंबईचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयासह काही प्रमुख कार्यालये मुंबईबाहेर हलविण्याचा विचार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले. पंढरपूरमधील विकासकामांच्या भूमिपूजन समारंभासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.

राज्यमंत्री पाटील म्हणाले, मुंबई शहर आणि उपनगरे झपाटय़ाने वाढत आहेत. वाहनांची गर्दी वाढते आहे. सर्वांची रीघ एकाच दिशेने असल्याने दक्षिण मुंबईवर त्याचा मोठा ताण येत आहे. भविष्यात हा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालये मुंबईबाहेर काढण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून नवी मुंबईच्या धर्तीवर मुंबई शहराच्या बाहेर ‘नयना’ हे अद्ययावत शहर वसविण्याचे काम सुरू आहे.

कॅनडा सरकारच्या मदतीची राज्यमंत्र्यांना माहितीच नाही

कॅनडा सरकार पंढरपूर शहराच्या विकासकामांसाठी दोन हजार कोटी रुपये देणार असल्याबाबात प्रश्न केला असता, याबाबत मला काहीही माहीत नाही, असे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. नगरविकास राज्यमंत्र्यांनीच हात वर केल्याने श्री विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मोठा गाजावाजा करून केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.