गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा


पुणे रिपोर्टर... : शहरामध्ये पुनर्निर्मिती न होणा-या प्लास्टिक कच-यामध्ये सर्वाधिक कचरा गुटख्याच्या पुड्यांचा असल्याची धक्कादायक माहिती महापालिका आणि स्वच्छता संस्थेच्या वतीने शहरामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. याशिवाय कुरकुरे-वेफर्सची पाकीट, बिस्किट पुडे, दुधाच्या पिशव्या, शाम्पूच्या पुड्यांच्या कचयाचे प्रमाणात देखील मोठे असल्याचे समोर आले आहे.
शासनाने राज्यात  मार्चपासून प्लास्टिक बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये गोळा होणारा प्लास्टिक कचरा, त्याचे वर्गीकरण करून सर्वाधिक पुनर्निर्मिती न होणारा प्लास्टिक कचरा कशापासून निर्माण होतो. हे पाहण्यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे प्रमुख राजेंद्र जगताप, स्वच्छ संस्थेच्या लक्ष्मी नारायण उपस्थित होत्या. यावेळी नारायण यांनी सांगितले की, पुणे शहरामध्ये दररोज सुमारे १२० ते १३० टन प्लास्टिक कचरा तयार होतो. यापैकी केवळ ४५ ते ५० टक्केच प्लास्टिक कचरा वेचकांमार्फत पुनर्निर्मितीसाठी पाठवला जातो. त्यामुळे तब्बल ५० टक्क्यांहून अधिक प्लास्टिकचा कचरा दररोज कोणत्याही प्रक्रियेसाठी पडून असतो. याबाबत ‘प्लास्टिक ब्रांड आॅडिट’ करून पुनर्निर्मिती न होणा-या प्लास्टिक कच-यांचे वर्गीकरण करण्यात आले.
महापालिका व स्वच्छ संस्थेच्या वतीने १६ ते २० मे दरम्यान बावधन, कोथरुड आणि गरवारे पूल नदी किनारा या भागात ही सर्वेक्षण मोहिम राबवली. यामध्ये ८७ टक्के प्लास्टिक कचरा हा भारतीय तर १३ टक्के कचरा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसचा असल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने गुटख्याच्या पुड्या, दुधाच्या पिशव्या, कडक प्लास्टिक, शाम्पू बाटल्या, वेफर्स, कुरकु-यांच्या पिशव्या, कॅरीबॅग आदी विविध स्वरुपाचे प्लास्टिक आढळून आले. यातील दूध पिशवी, कडक प्लास्टिक, शांपू बाटल्या आदी गोष्टी पुनर्निर्मिती (रिसायकल) करण्यासाठी पाठवले जाते. परंतु गुटखा, पानमसल्याच्या पुट्या, शाम्पूचे पाऊच, बिस्किटाचे पुडे, कुरकुरे, वेफर्सच्या पिशव्यांचे रिसायकल होत नसल्याचे समोर आले आहे.
--------
चितळे, अमूल दूध पिशव्यांचे प्रमाण जास्त
शहरामध्ये रिसायकल होणा-या पण प्लास्टिक कच-यामध्ये दूध पिशव्याचे प्रमामात जास्त असून, यात चितळे आणि आमूल दूध पिशव्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले. परंतु या दूध पिशव्या पुन्हा रिसायकल करण्यासाठी पाठविला जातो.
----------------------
पुण्यात रिसायकल न होणारा सर्वाधिक प्लास्टिक कचरा
शहरामध्ये विविध प्रकारचा गुटखा व पान मसाल्यांच्या पुड्यांचा कचरा सरासरीच्या १५ टक्के पेक्षा अधिक असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. त्याखालोखाल विविध बिस्टिकीट, वेफर्स, कुरकुरेचे पाकिटांचा कचरा देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी घातलाना या गोष्टींचा विचार करण्याची गरज असल्याचे मत लक्ष्मी नारायण यांनी येथे सांगितले.