गरीब कुटुंबातील चिमुरडीच्या उपचारासाठी अंजुमन सोसायटीचा मदतीचा हात

 अंजुमन सोसायटीच्यावतीने अलिशा शेख या मुलीच्या उपचारासाठी मदतीचा धनादेश प्रकाश जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी सह्याद्री हॉस्पीटलचे चेअरमन डॉ. दिग्गज दापके, अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, उबेद शेख, आसेफ शेख, सरफराज पटेल आदी. 

* विजेच्या धक्क्याने जखमी झाली होती चिमुरडी

उस्मानाबाद, दि. 4 - विद्युत तारेचा जबर धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या गरीब कुटुंबातील चिमुरडीच्या उपचारासाठी अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटीच्यावतीने मदतीचा हात देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. उस्मानाबाद येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या भूम येथील चिमुरडीच्या उपचारासाठी मदत म्हणून रूग्णालयाचा खर्च व औषधी रक्कम असा एकूण 44 हजार रूपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. 
25 एप्रिल 2018 रोजी भूम येथील शिवशंकरनगर भागात वीटभट्टीवर काम करणार्‍या कुटुंबातील आजी, मुलगी व नात धुतलेले कपडे तारेवर वाळू घालत असताना तारेमध्ये वीजप्रवाह असल्याने एकापाठोपाठ एक चिकटल्या गेल्या. यावेळी प्रसंगावधान राखून शेजार्‍यांनी लाकडाने त्यांना तारेपासून वेगळे केले. या दुर्दैवी घटनेत विजेच्या जबर धक्क्याने जहीदा कासीम शेख (वय 36) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची आई बानू वजीर पठाण (65) आणि चिमुरडी अलिशा (वय 5) या दोघी गंभीर जखमी झाल्या. जखमी बानू यांच्यावर भूम येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर अलिशा हिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोजीरोटीसाठी वीटभट्टीवर मोलमजुरी करणार्‍या या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने काहीजणांनी अंजुमन वेल्फेअर सोसायटीकडे मदतीसाठी विनंती केली. अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी तत्काळ अलिशा हिच्या उपचाराची सर्व जबाबदारी स्वीकारून आवश्यक तेवढी मदत देण्याची तयारी दर्शविली. पल्ला यांनी तत्काळ अलिशा हिला सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अंजुमन सोसायटीच्या मदतीमुळे अलिशा हिच्यावर सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार होऊन ती बरी झाली आहे. गुरूवार, 3 मे रोजी सायंकाळी तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपचार आणि औषधांच्या खर्चाच्या रकमेचा धनादेश प्रकाश जगताप यांच्या हस्ते जखमी अलिशा हिचे काका मुख्तार शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सह्याद्री हॉस्पीटल गरजू रूग्णांसाठी वेळोवेळी सहकार्य करीत असल्याबद्दल चेअरमन डॉ. दिग्गज दापके यांचेही अंजुमन सोसायटीच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, उपाध्यक्ष उबेद शेख, सहसचिव आसेफ शेख, कोषाध्यक्ष सरफराज पटेल, शाहेद शेख, वसीम शेख आदी उपस्थित होते.

136 रूग्णांना 10 लाख 84 हजाराची मदत
उस्मानाबाद शहरातील मुस्लीम समाजातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अंजुमन हेल्थ केअर वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून शेकडो गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे. या सोसायटीचे सर्वच सदस्य मुस्लीम असलेतरी जात-धर्म, आपला-जवळचा असा भेदभाव न करता गरजूंच्या मदतीसाठी  नेहमीच धावून जात आहेत. गरजू रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन रूग्णालयाचा खर्च तसेच औषधांवरील होणारा खर्चदेखील संस्थेच्यावतीने देण्यात येत आहे. आतापर्यंत सोसायटीच्यावतीने विविध जाती-धर्मातील 136 गरजू रूग्णांना तब्बल 10 लाख 84 हजार रूपयांची मदत देऊन सामाजिक कार्यात आदर्शवत कामगिरी केली आहे. 


दानपेटीद्वारे शहरातून मदतीचे संकलन
अंजुमन सोसायटीच्यावतीने गरजू रूग्णांच्या मदतीसाठी दानशूर व्यापारी, व्यावसायिकांकडून दानपेटीद्वारे मदतीचे संकलन केले जाते. उस्मानाबाद शहरातील वेगवेगळ्या व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तब्बल 200 लहानशा दानपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. गरजूंच्या मदतीसाठी यामध्ये व्यक्ती आपापल्या इच्छेनुसार रक्कम जमा करतात. ही रक्कम एकत्रित करून  ती गरजूपर्यंत पोहचविण्याचे काम कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अंजुमन सोसायटी करीत आहे.