लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रमेशअप्पा कराड यांची उमेद्वारी दाखलउस्मानाबाद, दि. 2 – विधान परिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी रमेशअप्पा काशीराम कराड यांनी बुधवार, दि. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे व तिनही जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रमेशअप्पा कराड यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले.
उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमात रमेशअप्पा कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देवून त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी स्वागत केले.
पक्ष प्रवेशानंतर बोलताना रमेशअप्पा कराड यांनी आपल्या भाषणातून भाजपला टार्गेट करत पुन्हा स्वगृही परत आल्याचे स्पष्ठ केले. 14 वर्षाचा वनवास आता संपला आहे. प्रामाणीकपणे काम करुनही अन्याय होत असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी जाहिर केले. विद्यमान मुख्यमंत्रयाबरोबर मी युवा मोर्चामध्ये काम केलेले आहे. त्यावेळेस ते कित्येक तास आमच्या सोबत राहत असत. पण मुख्यमंत्री झाल्यापासून ते आम्हाला भेटण्यासाठी वेळही देत नाहीत, आणि भेट झाली तरी बोलतही नाहीत अशी खंत व्यक्त करुन ते म्हणाले, भाजपात प्रामाणीकपणे काम करुन आपल्याला न्याय मिळाला नाही.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला पक्षात सन्मानाने प्रवेश देवून विधान परिषदेची उमेद्वारीही दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सन्माननीय नेते व मतदरांच्या आशीर्वादामुळे मी मोठया मताधिक्याने या निवडणूकीत विजयी होणार असल्याचा विश्वासही रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केला.  
यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे यांनी रमेशअप्पा कराड यांचा (भाजपा नेते) असा उल्लेख करुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला असून पक्षाने त्यांना उमेदवारी घोषीत केली आहे. रमेशअप्पा कराड यांचा 14 वर्षाचा वनवास संपला असून त्यांची खऱ्या अर्थाने घरवापशी झाली आहे. रमेशअप्पा कराड अनेक वर्षे भाजपचे कर्मठ नेते आणि गोपिनाथराव मुंडे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून राहिले. त्यामुळे भाजप त्यांना यावेळी विधान परिषदेची उमेद्वारी देईल असे वाटत होते. परंतु भाजपने त्यांच्यावर अन्याय केला म्हणून रमेशअप्पा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजितदादा पवार यांनी रमेशअप्पा कराड यांच्या प्रवेशाचे स्वागत करुन त्यांच्या उमेद्वारीवर शिक्कामोर्तब केले आहे. या मतदारसंघातून कराड यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असून ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीची नांदी ठरणार आहे. भाजप सरकार विरोधात जनमत तयार होत असून येत्या काळात राष्ट्रवादीचे वादंग निर्माण होणार आहे. अगामी लोकसभा व विधानसभा निवणूका एकतर्फी होवून भाजपा सत्तेतून हद्दपार होईल असा विश्वासही ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीचे लातूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांनी आपल्या भाषणात आपल्या जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद रमेशअप्पा कराड यांच्या मागे उभी करुन त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी आमदार ॲङ उषाताई दराडे, लातूरचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, प्रेदश सचिव पप्पु कुलकर्णी, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, अक्षय मुंदडा, हेमंत क्षीरसागर, चाकुरचे नगराध्यक्ष मिलींद महालिंगे, करीम गुळवे, रेपाणूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा रबीयाबी शफी शेख, मदन काळे, लातूर शहर प्रमुख जिल्हा सरचिटणीस ॲङ किरण बडे यांच्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद या तिनही जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महानगर पालीका, नगरपरिषदेतील विद्यमान पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.