पत्रकाराला मारहान सहपोलीस निरीक्षकाची उचलबांगडीरिपोर्टर...- आलेल्या तक्रारीवर काय कार्यवाही केली याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारास नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी यांनी जबर मारहाण केल्याची घटना बुधवार, ४ एप्रिल रोजी तुळजापूर तालुक्यातील ईटकळ चौकीत घडली. याप्रकरणी कायदा हातात घेवून पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणार्या संबंधित पोलिस अधिकार्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीची दखल घेत सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी याची तात्काळ उचलबांगडी करुन पोलिस नियंत्रण कक्षाला सलग्न करण्यात आले आहे.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, जिल्ह्यातील पत्रकार विकास पांढरे हे साप्ताहिक विवेकच्या मुंबई कार्यालयात उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना बुधवार, ४ एप्रिल रोजी इटकळ पोलिस चौकीच्या आवारात नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चौकीसमोर मारहाण केली.
मंगळवार, ३ एप्रिल रोजी तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे संदल मिरवणूकीत दारु पिऊन सद्दाम मुजावर या गावगुंडाने विकास पांढरे यांच्या घरासमोर येवून अश्लिल नृत्य करण्यास सुरुवात केली. यास पांढरे यांच्या कुटूंबियानी विरोध केल्यानंतर मुजावर याने चक्क घरात जावून पांढरे यांच्या वहिनी व त्यांच्या पुतनीस मारहाण केली. विकास पांढरे हे यात्रेनिमित्त काल गावाकडे आल्यानंतर घरच्यांनी या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर विकास पांढरे यांनी गावात असणार्या पोलिस चौकीत याबाबत माहिती विचारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी हजर असणारे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी यांनी विकास पांढरे यांना बेदम मारहाण केली. मुळात विकास पांढरे हे अपंग असल्याने मारहाण झाल्यानंतर ते खाली पडले. त्यानंतर सुर्यवंशी यांनी पांढरे यांना पोलिस चौकात आरोपीच्या खोलीत कोंडून ठेवले एवढेच नव्हे तर त्यांचा मोबाईल व ओळखपत्रही काढून घेतले. या शिवाय तुझी पत्रकारीताच संपवून टाकेन अशी धमकीही सुर्यवंशी याने पांढरे यांना दिली.
विकास पांढरे हे तरुण पत्रकार असून त्यांनी आतापर्यंत अनेक दैनिकात महत्वपुर्ण जवाबदारी पार पाडली आहे. सध्या ते साप्ताहीक विवेकमध्ये मुंबई येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना झालेल्या या मारहाणीचा जिल्हाभरातून तिव्र निषेध व्यक्त होत असून आज जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने धाराशिव येथे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून कायदा हातात घेणाNया पोलिस अधिकाNयावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, यांच्यासह कमलाकर कुलकर्णी, अनंत अडसूळ,  देवीदास पाठक, विकास पांढरे, विजय मुंडे, राजा वैद्य, मल्लिकार्जुन सोनवणे, अमर भातलवंडे, प्रशांत कावरे, कैलास चौधरी, जब्बार शेख, बाळासाहेब अणदूरकर, कालिदास म्हेत्रे, हेमंत कुलकर्णी यांच्यासह पत्रकार बांधव सहभागी झाले होते.
पत्रकारांमधून समाधान व्यक्त

पत्रकारांच्या मागणीच्या तात्काळ दखल घेत पोलिस प्रशासनाने नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना धाराशिव येथील पोलिस नियंत्रण कक्षाला सलंग्न करण्यात आले आहे. नळदुर्ग पोलिस ठाण्याचा कारभार आता स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि संतोष तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पत्रकाराला मारहाण आणि गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणार्या सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी याच्यावर तात्काळ कारवाई झाल्याने पत्रकारांमधून समाधान व्यक्त होत आहे.