उस्मानाबाद शहरामध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक कोटी मंजूर..रिपोर्टर...उस्मानाबाद शहारामध्ये विद्यार्थीनी, महिला व नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यासाठी शहरातील महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.त्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला छेडछाड, चैन स्नॅपिंग, चोरी, हानामारी यासारख्या घटनांना आळा बसविण्याकरिता उस्मानाबाद शहरामध्ये सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याची आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार निधीमधून रु. १० लक्ष निधी दिला होता. तसेच उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचे आश्वासीत केले होते. या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ मधून उस्मानाबाद शहरातील बसस्थानके, महाविद्यालय, शासकीय रुग्णालये व इतर महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्याकडे केली होती.
या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उस्मानाबाद शहारामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालकमंत्र्यांनी एक कोटी निधी मंजूर केला असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मेन रोड, लहूजी चौक, बसस्थानक, शिवाजी चौक, सुनिल प्लाझा, महात्मा फुले चौक, आकाशवाणी, आर. पी. कॉलेज चौक, आर्यसमाज चौक, भोसले हायस्कूल, जिजाऊ चौक, सुविधा हॉस्पिटल टी पॉईंट, माणिक चौक, काकडे प्लॉट चौक, सेंट्रल बिल्डींग, ज्ञानेश्वर मंदिर, अभिनव हायस्कूल, तेरणा कॉलेज, एम.आय.डी.सी., डी-मार्ट रोड, पोतदार स्कूल रोड, चिरायु हॉस्पिटल जवळील चौक, समता नगर, सह्याद्री कॉर्नर, आंबेडकर चौक, गाडगे महाराज चौक, पोष्ट ऑफीस चौक, छ. शिवाजी हायस्कूल, जिल्हा सामान्य रुग्णालय, भिमनगर, काळा मारुती चौक, गवळी गल्ली, निंबाळकर गल्ली, माऊली चौक, नेहरु चौक, तालिम चौक, शम्स चौक, दर्गा चौक, आण्णाभाऊ साठे चौक, आयुर्वेदिक कॉलेज, गणेश नगर, देशपांडे गिरणी, आठवडी बाजार, ताजमहल चौक, न. प. शॉपिंग कॉम्प्लेक्स, विजय चौक, सावरकर चौक, बोंबले हनुमान चौक, सांजा चौक  इत्यादी ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास १०० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
कॅमेरे बसविण्यासाठी नगर परिषदेची परवानगी अद्याप प्रलंबित आहे, तसेच यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाची परवानगी आवश्यक असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे.
सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविल्यामुळे सुरक्षेमध्ये निश्चितच वाढ होऊन शहरवासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  शहराच्या दृष्टीने हा खूप महत्वपूर्ण प्रकल्प असून प्रकल्प अहवालानुसार पूर्ण सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी आणखीन निधीची आवशकता आहे, त्यामुळे शहरातील सक्षम व्यक्तींनी यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.