आ.राणाजगजितसिंह पाटील सिंचन प्रकल्पाच्या समावेशासाठी शिष्टमंडळासह घेणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट..रिपोर्टर..  कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात शिष्टमंडळ घेवून दिल्ली येथे केंद्रीय जलस्रोत व नदी विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेवून विनंती करण्यात येणार आहे. आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी या अनुषंगाने काल दि.२९/०३/२०१८ रोजी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली होती, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पासाठी पुरेसा निधी मिळावा याबाबत जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब सातत्याने पाठपुरावा करत आहेत. तसेच केंद्रीय जलस्रोत व नदी विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांना देखील या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करावा अशी विनंती आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी पत्राद्वारे केली होती.

उस्मानाबाद हा अवर्षणप्रवण क्षेत्रातील, आर्थिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा आहे. येथील ७० टक्के पेक्षाही अधिक नागरिक आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. सततचा होत असलेला दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत आहे. पर्यायाने याबाबींमुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न देखील अत्यल्प आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत दुर्दैवाने जास्त आहे. या सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारने नीती आयोगामार्फत मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या देशातील ११५ जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश केलेला आहे.

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचा भूभाग (प्रामुख्याने उस्मानाबाद जिल्हा व बीड जिल्ह्यातील काही भाग) याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत राज्य सरकार कडून मराठवाड्यात खूप कमी प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या अन्यायाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता लढा देत आहे.

सततच्या पाठपुराव्यानंतर फेब्रुवारी २००५ मध्ये राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कृष्णा मराठवाडा प्रकल्पास मान्यता देण्यात आली. तसेच दि. २३.०८.२००७ रोजी प्रशासकीय मान्यता  देवून २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचे राज्य सरकारने कबुल केले होते. तदनंतर यात बदल करून कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आला व पहिल्या टप्प्यात कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून ७ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा काही भाग कार्यान्वित होणे गरजेचे आहे. यासाठी अंदाजे रु. १००० कोटीची आवश्यकता आहे.

या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेवून औरंगाबाद येथे दि. ०४ ऑक्टोबर, २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण ४८१७ कोटी किमतीच्या कामाचे २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षाचे नियोजन करण्यात आले. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दरवर्षी या प्रकल्पास रु. १२०० कोटी देण्याचे जाहीर केले होते, परंतु सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात या योजनेस केवळ रु.१५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे, सन २०१७-१८ मध्ये केवळ रु.१२५ कोटी देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या किमतीत दर वर्षी होणारी वाढ लक्षात घेता एवढी कमी वार्षिक आर्थिक तरतूद केली तर हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. 

 प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने अंतर्गत महाराष्ट्रातील २६ प्रकल्प घेण्यात आल्याचे समजते, परंतु या अति महत्वाच्या प्रकल्पाचा यात समावेश नाही. त्यामुळे जिल्ह्याची भौगोलिक, आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेवून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महत्वाच्या कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री सिंचाई योजनेत समावेश करावा व पुरेशा निधीची उपलब्धता करून प्रकल्प येत्या ३ वर्षात कार्यान्वित करावा. जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन प्रकल्प व शेतीसाठी बंद जलवाहिनीने पाणी पुरवठा करणे यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतुन आराखडा तयार करण्याचे आदेश देवून पुरेशी आर्थिक तरतूद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

तसेच सोलापूर- उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या निकृष्ठ व अर्धवट कामामुळे या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी उड्डाण पूल व भुयारी मार्ग गरज असतांना देखील करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे मुद्दे देखील चर्च दरम्यान उपस्थित करण्यात येणार आहेत.
या शिष्टमंडळामध्ये आ.राहुल मोटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.सुरेश बिराजदार सहभागी होणार असून जिल्ह्यासाठी या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना देखील या शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.