महाराष्ट्राला आजपर्यंत ७७४ पद्म पुरस्कार(दि. २० मार्च रोजी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत, त्यानिमित्त विशेष वृत्त)

नवी दिल्ली :
देशात आजपर्यंत ४५०१ व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, यामध्ये ४५ भारतरत्न, ३०३ पद्मविभूषण, १२४१ पद्मभूषण आणि २९१२ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील ७७४ मान्यवरांचा समावेश आहे.

देशात १९५४ सालापासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कला, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, व्यापार व उद्योग, सामाजिक कार्य, वैद्यकशास्त्र, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

४५ मान्यवरांना भारतरत्न प्रदान
आजपर्यंत ४५ मान्यवर व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला व खान अब्दुल गफार खान हे अभारतीय व्यक्ती आहेत, ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १९९० साली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) व नेल्सन मंडेला यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील आठ मान्यवर व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्रातून स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर या एकमेव महिला आहेत तर देशातून पाच महिलांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पद्मविभूषण पुरस्काराने ३०३ मान्यवर सन्मानित
देशात आजपर्यंत ३०३ व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मभूषण पुरस्काराने १२४१ तर पद्मश्री पुरस्काराने २९१२ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. या पद्म पुरस्कारात देशातील ५५० महिलांचा समावेश आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १३२ महिलांचा समावेश आहे.

देशातील ३९८ महिलांना पद्मश्री पुरस्कार
देशात आजपर्यंत प्रदान करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये ३९८ महिलांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९६ महिलांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार आजपर्यंत ११३ महिलांना प्रदान करण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील २८ महिलांचा समावेश आहे तर ३४ महिलांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ७ महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्राला ४६५ पद्मश्री पुरस्कार
महाराष्ट्राला आजपर्यंत ४६५ पद्मश्री, २४२ पद्मभूषण, ५९ पद्मविभूषण व ८ भारतरत्न, असे एकूण ७७४ पद्म पुरस्कार मिळाले आहेत.