सोशल मीडिया महामित्रच्या माध्यमातून तरुण सकारात्मक दृष्टीने एकत्र येण्यास चालना

सोशल मीडिया महामित्रांची प्रतिक्रिया

उस्मानाबाद :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र उपक्रमातील संवादसत्र कार्यक्रमात सोशल मीडिया महामित्रच्या माध्यमातून तरुण सकारात्मक दृष्टीने एकत्र येण्यास चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया महामित्राने आज येथे दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील निवडक सहभागींनी आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात संवादसत्र स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या गटचर्चेत उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर व उमरगा या क्षेत्रातील एकूण 19 युवकांनी सहभाग नोंदविला.

जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी सोशल मीडिया महामित्र उपक्रम आणि संवादसत्र उपक्रमाबद्दल प्रास्ताविकातून उपस्थित स्पर्धक परीक्षक, निरीक्षक यांना माहिती सांगितली.

दिवसभरात एकूण चार टप्प्यातील स्पर्धकांनी महामित्र उपक्रमातून काय साध्य होईल? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांचा प्रभाव किती खरा किती खोटा? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांची इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बरोबरी? अशा विषयांवर गटचर्चा होऊन ही स्पर्धा संपन्न झाली.

या गटचर्चांचे परीक्षण व निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, पत्रकार संतोष जाधव, ज्येष्ठ शिक्षिका कमलताई नलावडे, साहित्यिक राजेंद्र अत्रे, शासकीय अधिकारी विकास कुलकर्णी यांच्यासह संतोष कांबळे (कोळी), गणेश कुलकर्णी यांनी केले.

शेवटी सहभागी सर्व स्पर्धकांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अभिनंदन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.