नौकरी महोत्सवात ६ हजार बेरोजगारांना मिळाली नौकरी


 
 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा यशस्वी उपक्रम


रिपोर्टर.   उस्मानाबाद. येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भाजपाच्यावतीने भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर (आण्णा) पाटील यांच्या पुढाकारातून रविवार दि. २५ मार्च रोजी श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या मैदानावर पार पडलेल्या भव्य नौकरी महोत्सवात २३ हजार २०४ सुशिक्षीत बेरोजगार युवक - युवतींनी अर्ज नोंदणी केली होती. महोत्सवात सहभागी झालेल्या विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या महोत्सवांतील युवक - युवतींच्या मुलाखती व कागदपत्राची पडताळणी करून ६ हजार २४२ युवक - युवतींना नौकरीचे नियुक्तीपत्र दिले. 
श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या नौकरी महोत्सवात रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत नौकरी महोत्सवात सहभागी झालेल्या युवक - युवतींच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होता. सकाळी १० वाजल्यापासून उमेदवारांची अर्ज नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. सकाळी ११.३० च्या सुमारास प्रत्यक्ष मुलाखतींना प्रारंभ झाला. १०३ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज नोंदणी केलेल्या २३ हजार २०४ युवक - युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ६ हजार २४२ युवक - युवतींना नौकरीचे नियुक्ती पत्र मिळाले. प्रातिनिधीक स्वरुपात निवड झालेल्या काही युवक - युवतींना  महोत्सवाचे संयोजक व भाजपा प्र.का.सदस्य सुधीर (आण्णा) पाटील, ऍड. अनिल काळे, प्रभाकर मुळे, राजाभाऊ बागल, आदम शेख, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, न.प. बांधकाम सभापती शिवाजीराव गवळी -पंगुडवाले, शिवाजीराव गिड्डे, प्रविण पाठक आदींच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. या महोत्सवात १ हजार ५४८ युवक - युवतींना नौकरीच्या प्रतिक्षा यादीसाठी निवडण्यात आले आहे. यांनादेखील रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकते. कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता हजारोंच्या संख्येने सुशिक्षीत युवक -युवतींचा हा नौकरी महोत्सव भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक आदींच्या परिश्रमातून यशस्वीरित्या पार पडला. धाराशिव जिल्ह्यात अशा स्वरुपाचा भव्य नौकरी महोत्सव तोही विनामुल्य आयोजीत केल्याबद्दल महोत्सवात सहभागी झालेल्या युवक - युवतींनी महोत्सवाचे संयोजक सुधीर (आण्णा) पाटील यांचे आभार व्यक्त केले व शेतकरी कुटूंबातील आम्हा गरीब युवक - युवतींसाठी नौकरीची संधी निर्माण करून दिल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले. या महोत्सवात शेतकरी कुटूंबातील युवक - युवतींसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील युवक - युवतीदेखील सहभागी झाले होते. नौकरीसाठी या कुटूंबातील युवक - युवतींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना नौकरीची संधी देण्यात आली.