ऋषीकेश पाटील आणि अतुल माने रौप्यपदकाचे मानकरी


३७ वी मुलांची ग्रीकोरोमन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : महाराष्ट्राची दोन रौप्य, दोन ब्राँझपदकांसह चार पदकांची कमाई


पुणे  : स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री नॅशनल स्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल तसेच महाराष्ट्र  कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या मुलांच्या ग्रीकोरोमन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दुस-या  दिवशी महाराष्ट्राच्या मल्लांना छाप पाडता आली नाही.  घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतानाही महाराष्ट्राच्या मल्लांना  दोन रौप्य आणि तीन ब्रॉंझपदकांवर समाधान मानावे लागले. ऋषिकेश  पाटील (४५ किलो) आणि अतुल माने (११० किलो) या दोघांना रौप्यपदक मिळाले. तर, प्रविण पाटील (५१ किलो), विश्वजीत पाटील (६० किलो) कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्या अतुल माने याने आपली धाकटी बहीण रेश्मा मानेचा  कित्ता गिरवला. मात्र, तो सुवर्ण पदक मिळवू शकला नाही. विजेतेपदाच्या शर्यतीत त्याला पंजाबच्या नरिंदरकडून ३-७ असा पराभव पत्करावा लागला. कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करणा-या अतुलला आता अधिक सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तो प्रथमच खेळला आणि रौप्यपदकाची कमाई केली.
महाराष्ट्राला दुसरे रौप्यपदक मिळवून देणारा ऋषिकेश पाटील मुळचा कोल्हापूरचा असला, तरी तो बीईजीमध्ये सराव करतो. शिवशंकर भावले, प्रताप शिंदे यांच्याकडे तो सराव करतो. घरातून कुस्तीचा वारसा नसला, तरी मेहनतीने ऋषिकेशने कुस्तीत आपले नाव कमावले आहे. खेलो इंडिया स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. साईच्या अतंर्गत राष्ट्रीय स्पर्धेत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 
स्पर्धेच्या दुस-या दिवशी देखील हरियानाने आपले वर्चस्व कायम राखले. ग्रीको रोमन प्रकारातही  त्यांनी १९० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. दिल्ली १३७ गुणांसह दुस-या तर उत्तरप्रदेश १३६ गुणांसह तीस-या क्रमांकावर राहीले.