बळीराजा चेतना अभियान अंतर्गत आरोग्य कार्ड उद्‌घाटन शुभारंभ

उस्मानाबाद-- बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने त्रस्त शेतकरी कुटुंबाला आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येत असून या आरोग्य कार्डचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही.वडगावे यांच्या हस्ते करण्यात आले.
     आज शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी व त्यामुळे अडचणीस सामोरे जावे लागत आहे. या अडचणी सुटाव्यात, प्रशासन कुटुंबापर्यंत पोहोचावे व आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी विविध विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यात आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य कार्डाद्वारे कुटुंबाच्या अडचणी प्रशासनास कळविणे व त्यानुसार मदत करणे शक्य होणार आहे. त्यात आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी यांच्यामार्फत समुपदेशन, आरोग्याचा सल्ला व गंभीर आजाराबाबत मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे.
     जिल्ह्यातील 15 हजार 300 त्रस्त शेतकरी कुटुंबाला आशा कार्यकर्ती व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन वेळा भेट देऊन आरोग्य सेवेचा लाभ व तणावमुक्तीसाठी समुपदेशन केले आहे. या आरोग्य कार्ड मध्ये कुटुंब प्रमुखाची सर्वसाधारण माहिती, कुटुंबाचा व्यवसाय, कुटुंबातील सदस्य संख्या, गंभीर आजार, आजाराचे निदान/स्वरुप, आजारावर सध्या कुठे उपचार सुरु आहेत, आरोग्य कर्मचारी यांनी कुटुंबाला भेट दिल्याचा दिनांक, उपचार व इतर दिलेल्या सेवांचा तपशिलाचा समावेश असून पुढील आरोग्याचा लाभ देण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. शिवाय त्यांना दिलेल्या सेवांचे सनियंत्रणही करता येणार आहे. कुटुंबातील सहा सदस्याच्या माहितीचा समावेश या कार्डमध्ये करण्यात आलेला आहे.
     महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती व उस्मानाबाद जिल्ह्यातील या योजनेतंर्गत प्राधिकृत रुग्णालयाची माहितीही देण्यात आली आहे. शेवटच्या पृष्ठावर वेगवेगळे टोल फ्री नंबर हे शेतकऱ्यांना आरोग्य सेवासोबत इतर लाभ घेण्यासाठी मदतीचे ठरणार आहेत.
     शेतकरी कुटुंबीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व तणावमुक्त जीवन जगावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केले.
त्रस्त शेतकरी कुटुंबाला आरोग्य कार्ड वाटप हा उपक्रम नावीन्यपूर्ण होणार असून यामुळे प्रत्येक त्रस्त शेतकरी कुटुंबापर्यंत पोहचून त्यांचे आरोग्य संबंधीचे प्रश्न सोडवता येतील, असे मत जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.  
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्ड वाटप केले जाणार असून याचा नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे यांनी यावेळी सांगितले.