गरजू रुग्णांवर शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार -वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजनउस्मानाबाद,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आरोग्य राज्य मंत्री विजय देशमुख, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आरोग्य संचालक डॉ.शिनगारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, मिलिंद पाटील, सुधीर पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खोचरे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, राजेश्वर महाराज नंदगावकर, डॉ.सुधीर देशमुख, आरोग्य दूत रामेश्वर नाईक, होमिओपॅथीक कॉन्सील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.अजित फुंदे, संदीप जाधव, डॉ. निकुंभ आदींची  प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,  प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा  मिळत नाहीत अशा सामान्य गरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रामीण आणि दुर्गम भागातील  नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. सेवाभाव म्हणून आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  गरीब, वंचितांची सेवा हा भाव मनात ठेऊन सर्व लोकप्रतिनिधी,  प्रशासन यांना सोबत घेऊन हे काम करण्यात येत आहे.  या आरोग्य शिबिरात येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करुन त्यावर पुढील उपचार करण्यात येणार असून येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ही शासन उचलणार आहे. अशा शिबीरांच्या कार्यातून प्रत्येक जिल्ह्यात  स्वयंस्फूर्तीने काम करणारे नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. शिबिरात येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी कितीही खर्च आला तरी प्रत्येक गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येईल व रुग्ण बरा होईपर्यंत त्याच्यावर संपूर्ण उपचार करण्यात येतील, असेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.

उस्मानाबाद येथे पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्याचबरोबर  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज सुरु करण्याचा सरकारचा संकल्प आहे. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मागणी संदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठवाडयासाठी महत्वाचा असलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसून या प्रकल्पाला गती देण्यासाठी पर्यावरण खात्याची दिल्लीहून परवानगी आणली असून दरवर्षी या प्रकल्पासाठी 12 कोटी रुपयांचा निधी देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आता कामांना वेग आला असून यासाठी पुढील काळात निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.हा प्रकल्प पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल.त्याचबरोबर निम्न तेरणा प्रकल्पासाठी देखील 7 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.

सहकार मंत्री सुभाष देशमुख राज्यात सर्वत्र अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून राज्याचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 50 कोटी जनतेचा आरोग्य विमा उतरविण्याचा संकल्प देखील राज्य सरकारने केला असून गरीब व गरजू रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी राज्यसरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करण्यात येणारअसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्य मंत्री विजय देशमुख म्हणाले की, दुर्लक्षित असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा या शिबिराच्या माध्यमातून पुरविली जाणार असून आजार संपूर्ण बरा होईपर्यंत त्यांना मदत केली जाणार आहे. ज्यांना  ज्या आरोग्य उपचाराची गरज आहे त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथील  शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन ते पूर्ण केले जाईल.

शिबिरात येणाऱ्या  नागरिकांसाठी मोफत औषधे आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. या सामाजिक कामासाठी अनेक  दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग आदींचे सहकार्य शिबिरासाठी मिळाले. स्थानिक डॉक्टरांसह  सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी यासाठी सहकार्य केले.

आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पद्मश्री डॉ.लहाने, वैद्यकीय शिक्षण  विभागाचे संचालक डॉ. शिनगारे, हभप बोधले महाराज यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, डॉ.चंदनवाले, डॉ.पानशेतकर, डॉ. रणजित जगताप, डॉ. चौरसिया, डॉ. जयश्री  तोडकर, डॉ. रागिणी पारेख आदीसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, आंबेजोगाई, उस्मानाबाद  येथील तज्ञ डॉक्टरचा सहभाग होता. या शिबिरात जवळपास 1 लाख 22 हजार  रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात ज्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी पाठविण्याबाबत शिफारस केली आहे त्यांना दिनांक 7, 8, 9 मार्च 2018 रोजी सर्व जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा बोलाविले जाणार असून त्यांच्या पुर्नतपासणीनंतर त्यांना शस्त्रक्रिया किंवा पुढील आवश्यक उपचारांसाठी पाठविले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी महाआरोग्य शिबिराच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. या शिबिरात  जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून महिला व बालक मोठया संख्येने उपस्थित होते.
:- महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून ग्रामीण भागातील वाडी, वस्तीवर राहणाऱ्या तसेच दुर्गम भागातील लोकांना आरोग्य उपचार मिळावेत म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केले.