युवा पिढी राजकारणात आल्यास देशाला मिळेल वेगळी दिशा खासदार डॉ.हिना गावीत


पुणे : राजकारणामध्ये चांगल्या कामाची दखल घेऊन प्रोत्साहन देणे ही गोष्ट खूप कमी ठिकाणी पहायला मिळ्ते. सध्या राजकारण आणि राजकारण्यांबद्दल अनेक ठिकाणी नकारात्मक विचार होतो. परंतु युवा पुढी राजकारणात आल्यास देशाला वेगळी दृष्टी व दिशा मिळणार आहे. सकारात्मक बदल घडविण्याची ताकद युवकांमध्ये असून तरुणाईने मोठया प्रमाणात राजकारणात यायला हवे, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी केले.
न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिस-या युवा संसदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार सप्तर्षी, माजी खासदार विजयकुमार गावीत, काका पवार, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. 
उद््घाटन समारंभामध्ये आदर्श खासदार पुरस्कार डॉ.हिना गावीत, आदर्श आमदार बच्चू कडू व संग्राम थोपटे, आदर्श नगरसेवक गोपाळ चिंतल, आदर्श सरपंच ॠतुजा आनंदगांवकर, आदर्श युवा पुरस्कार धावपटू ललिता बाबर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी हे पुरस्काराचे स्वरुप होते. सोड नाराजी, घे भरारी हे युवकांना संदेशपर सत्र यावेळी झाले. 
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, अर्थ, शिक्षण, समाजव्यवस्था प्रत्येक राजकारणी व्यक्तीला कळायला हवी. राजकारणात घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही. प्रत्येक पिढीला देशातील लोकशाहीची वेगवेगळी परिस्थिती पहायला मिळायला हवी. चांगल्या व्यक्तींनी राजकारणात निवडून येण्यामागे त्यांचे काम व विचार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 
संग्राम थोपटे म्हणाले, सध्याच्या राजकारणात फेस व्हॅल्यू आणि ब्रँडिंग या गोष्टींना महत्त्व आहे. परंतु त्यासोबतच चारित्र्य, निष्ठा आणि समाजाभिमुख काम केले, तर राजकारणात उच्च पदावर पोहोचता येईल. सध्या ग्रामीण जनता रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. ग्रामीण भागाचा योग्य विकास झाला, तर वाढती शहरीकरणाची समस्या कमी होईल.
गोपाळ चिंतल म्हणाले, सत्य, सातत्य, संघर्ष, काळ, काम, वेग या गोष्टी पाळल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करायला हवे. ते ध्येय पूर्ण करण्यास परिश्रमही घ्यायला हवे. तरुणांमध्ये सकारात्मकता असेल, तर नव्या समाजनिर्मीतीची संकल्पना मांडणे सहज शक्य आहे. 
ॠतुजा आनंदगावकर म्हणाल्या, युवा पिढीमध्ये सोशल मीडियामुळे काही प्रमाणात नकारात्मकता निर्माण होत आहे. युवा शक्तीमध्ये मोठया प्रमाणात उर्जा आहे. ती उर्जा योग्य ठिकाणी वापरता आली पाहिजे. देशाचे नागरिक म्हणून प्रत्येक युवकाने आपापली जबाबदारी पार पाडली, तर अनेक सामाजिक प्रश्न सुटणे सहज शक्य आहे. 
ललिता बाबर म्हणाल्या, समाजकारण असो वा राजकारण कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी ध्येयनिश्चिती करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठया प्रमाणात हुशारी आहे. ती हुशारी शोधणे आणि त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, युवकांनी राजकारणात येऊन सशक्त भारताकरीता पुढे यावे, यासाठी युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ राजकारण करीत नव्या संकल्पना युवकांकडून आल्यास देशाचे लोकतंत्र चांगले होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथून सुमारे २५० विद्यार्थी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून संसदेत सहभागी झाले आहेत. तर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा, मराठवाडा, मुंबई यांसह विविध भागांतून २ हजार विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये आले आहेत. कॉमनवेल्थ युथ कौन्सिलचे यंदा संसदेला सहकार्य मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रा.अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.