नीती आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्हयांच्या यादीतून उस्मानाबादला बाहेर काढण्यासाठी कटीबध्द होवू- पालकमंत्री दिवाकर रावतेपालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते  मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

          उस्मानाबाद, दि.26 :-  नीती आयोगाने ज्या 125 मागास जिल्हयांची यादी जाहीर केली आहे त्यात उस्मानाबाद जिल्हयाचा क्रमांक 78 वा आहे, आपण सर्वांनी या जिल्हयाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करुन या यादीतून लवकरात-लवकर बाहेर पडण्यासाठी कटीबध्द होवू या, या जिल्हयाला स्वावलंबी प्रगत जिल्हा म्हणून नावलौकीक मिळवून देवूया, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक  दिनाच्या 68 व्या वर्धापन दिन  आज जिल्ह्यात सर्वत्र  उत्साहाने साजरा करण्यात आला.  यानिमित्त  विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित  करण्यात आले. येथील  पोलीस संचलन मैदानावर  पालकमंत्री दिवाकर रावते  यांच्या हस्ते  मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे उपस्थित होते.

प्रारंभी  सकाळी 9.15 वाजता  पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते  ध्वजारोहण  होताच पोलीस दलाने  राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाचे महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल,जलद प्रतिसाद  पथक, श्वान पथक,दंगल नियंत्रण  पथक  आदी पथकांच्या  संचलनाची मानवंदना  पालकमंत्री श्री. रावते यांनी स्विकारुन यावेळी समारंभाला उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर देशातील व महाराष्ट्रातील ज्या मान्यवरांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावरील पथसंचलनात ज्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे या सर्वांचेही श्री. रावते यांनी अभिनंदन केले.

पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करताना भारतीय मतदाराला संसदीय लोकशाहीने मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे याची जाणीव ठेवून या अधिकाराचा वापर जबाबदारीपूर्वक करावा, त्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे.  याबरोबरच निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणूका घेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनीही निर्भिडपणे काम करण्याची गरज आहे आणि सध्याच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये त्याप्रकारे सुलभ सुविधाही उपलब्ध आहेत. म्हणून सर्वांनी मिळून भारतीय लोकशाहीचा अभिमान बाळगून तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

देशातील काही राज्यात चित्रपटावरुन उसळलेल्या हिंसाचार आणि कायदा हातात घेणाऱ्यां समोर सत्ताधाऱ्यांनी पत्करलेली सपशेल शरणागती या दोन गोष्टी देशासमोरील आणि राज्यघटनेसमोरील आव्हाने अधोरेखित करणाऱ्या आहेत. कायद्याच्या राज्याला आव्हान देणारी झुंडशाही बळकट होत असल्याचे चित्र 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना समोर येणे कमालीचे दुर्देवी आहे. धर्म, जात, भाषा, वंश, संस्कृती यासह अनेक बाबतीत विविधता असलेल्या भारताला समान धाग्यांनी गुंफणारी आणि समतेचे तत्व प्रत्यक्षात आणणारी भारतीय राज्यघटना हे आपले वैशिष्ट्य आहे. देशातील वंचितांना, उपेक्षितांना गरिबातल्या गरिबांना ताठ मानेने जगण्याचा अधिकार देणाऱ्या, कायद्यासमोर सर्वांना समान लेखणाऱ्या आणि चौकट ठळक करणाऱ्या या राज्यघटनेतील मूल्यांची बूज न राखणाऱ्या घटना वाढत असल्याची पार्श्वभूमी प्रजासत्ताक दिनाला आहे, असे सांगून  श्री. रावते यांनी जिल्हयातील महसूल, आरोग्य, कृषी, बळीराजा चेतना अभियान, शेतकरी कर्जमाफी, जिल्हा परिषद, मुद्रा बँक योजना, पशुसंवर्धन विभाग, जलयुक्त शिवार, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सहकार विभाग, शिक्षण विभाग आदि क्षेत्रांमध्ये झालेल्या उल्लेखनीय कामांबद्दल संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने जिल्हयातील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजीटल यंत्रणा उभी करण्यासाठी 3 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे, याशिवाय जिल्हयातील 51 पशुवैद्यकीय संस्था आय.एस.ओ. दर्जा मिळेल अशा पध्दतीने त्यांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे तसेच पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 364 गटांना उस्मानाबादी शेळीचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी वितरीतही करण्यात आला आहे, दुसऱ्या टप्प्यात 759 गटांना उस्मानाबादी शेळीचे वितरण करण्यात येणार आहे, यासाठीही आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत आपल्या जिल्हयातील एकूण 82 हजार 676 शेतकऱ्यांना 315 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त झाला आहे, जिल्हयात प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची अंमलबजावणी चांगल्या रितीने सुरु आहे अशा विविध बाबींचा उल्लेख केला.

त्याचप्रमाणे नानाजी देशमुख योजनेंतर्गत हवामान आधारीत शेतीची मोहीम लवकरच या जिल्हयात सुरु होणार असून बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येसारखा कलंक पुसण्यासाठी शासन आणि प्रशासन जिल्हयात विविध योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगून श्री. रावते यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील जास्तीत-जास्त नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी  यासाठी राबविण्यात येत असलेल्या लोकराज्यग्राम, लोकराज्यशाळा, लोकराज्य महाविद्यालय यासारख्या अभिनव उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अवयवदानासारख्या पवित्र अभियानात जास्तीत-जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करुन या जिल्हयाचे  नाव जागतिक पातळीवर प्रसिध्द करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित संचलनात विविध  विभागांचे  आकर्षक  चित्ररथही  सहभागी झाले होते.  संबंधित  विभागांच्या  योजनांची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ  सर्वांचे लक्ष वेधून  घेत होते. यात जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत  मिशन कक्ष,  आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग,अग्निशमन, बॉम्बशोधक, पोलीस  विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्तगाव मोहीम पथक,आपत्ती व्यवस्थापन पथक,वन विभाग,जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुसज्ज रुग्णवाहिका,  महिला छेडछाडविरोधी पथक, उप प्रादेशिक परिवहन विभाग, होमगार्ड्स , स्काऊट गाईड्स आदी सहभागी झाले होते .

या समारंभाला उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बनसोडे, श्री. अजिंक्य पवार, विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन गोडबोले, महिला व बाल विकास अधिकारी श्री. सावंत, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. रेड्डी, श्री. पवार, तहसिलदार सुजित नरहरे, राहुल पाटील, अभय मस्के, नेहरु युवा केंद्राचे विकास कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, विभागांचे  अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

यावेळी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. रावते यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2017 चे उदिष्ट महाराष्ट्रात व औरंगाबाद विभागात सर्वात प्रथम पूर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे, 7/12 संगणकीकरणाचे 100 टक्के काम पूर्ण केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून जाणाऱ्या लोकांचे प्राण वाचविणे व पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वयाने उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांच्याबरोबरच सहाय्यक पोलीस निरीक्षक एफ.बी. मेंगडे, पोलीस कॉन्स्टेबल व्ही.एन. देशमुख, पी.व्ही. ओव्हळ, व्ही.डी. मोहिते यांचा तर सि.सि.टी.एन.एस. प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणी केल्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. मिरकले, सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विरयानी कदम, गुन्हे दोष सिध्दीमध्ये गुणवत्तापूर्ण काम केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उत्कृष्ठ तपास केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस. मानभाव यांचा, महिला व मुलींविषयीच्या अपराधांमध्ये जनजागृती बाबत उत्तम काम केल्याबाबत महिला सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल एम.एस. दामोदरे-पानसे, जिल्हा क्रिडा पुरस्कारांतर्गत कु. विशाल शिंदे, चेतन सपकाळ, कुमारी शितल शिंदे या खेळाडूंचा तर गुणवंत क्रिडा मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण मोहिते, गुणवंत क्रिडा संघटक म्हणून राजकुमार सोमवंशी, हरीतसेना सदस्य नोंदणी उत्कृष्ठ सहभागाबाबत कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. गरड आणि एकता फाऊंडेशनचे अभिलाष लोमटे व अमित कदम यांना पालकमंत्री दिवाकर रावते आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राज्यातील पहिले लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय आणि पहिले लोकराज्य शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांचाही पालकमंत्री श्री. रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या समारंभाच्या शेवटी यमगरवाडी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळा,  ग्रीनलँड हायस्कूल व लिटलस्टार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.