जननी सखी योजनेचा शुभारंभ...


खुल्या प्रवर्गातिल महिलेच्या प्रती प्रसुतिसाठी आशांना रु.३०० भत्ता दिला जाणार- उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील
संपूर्ण राज्यात अशी योजना सुरु करणारी उस्मानाबाद जिल्हा परिषद सर्व प्रथम... 

आरोग्य विभाग जि.प. उस्मानाबादच्या वतीने दि.०७/१२/२०१७ रोजी पुष्पक मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे 'आशा दिन' कार्यक्रम संपन्न झाला. उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडून संपूर्ण राज्यात सर्व प्रथमच सुरु करण्यात आलेल्या जननी सखी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सदरची जननी सखी योजना ही केंद्र शासनाच्या जननी सुरक्षा योजनेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी वापरुन विशेष बाब म्हणून नाविन्यपूर्ण योजना तयार करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांच्या प्रसुतीसाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर्सना कोणत्याही प्रकारचे शासकीय मानधन दिले जात नाही. याबाबतची मागणी ब-याच दिवासांपासून आशा वर्कर्स करीत होत्या. ग्रामीण भागातील मुलींचे लिंग गुणोत्तर वाढ व्हावे, ग्रामीण भागातील महिलांची प्रसुति स्थानिक ठिकाणच्या शासकीय आरोग्य केंद्र / उपकेंद्रात व्हावी जेणेकरुन प्रसुती दरम्यान बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, आशांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा सेस फंडातून जननी सखी योजना ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत आशांना खुल्या प्रवर्गातिल महिलेच्या प्रती प्रसुतिसाठी रुपये 300/- (अक्षरी रुपये तीनशे) एवढा भत्ता दिला जाणार आहे. सदर योजनेचा शुभारंभ आशा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी करण्यात आला. 
या प्रसंगी जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अशी नाविन्यपूर्ण योजना राबविणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील पहिलाच जिल्हा आहे. आम्ही घेतलेला हा खूप मोठा धाडसी निर्णय आहे. योजनेचे महत्व लक्षात घेऊन निश्चितच ही योजना भविष्यात शासनस्तरावरुन राबविली जाईल याची मला खात्री आहे. ग्रामीण भागात अगदी तळागाळात महिलांसाठी आरोग्यसेवा पुरविणारी आशा कार्यकर्त्यां यांचे आरोग्य सेवेतील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी आशांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना खुल्या प्रवर्गातील महिलांच्या प्रसुतीसाठीही योग्य भत्ता मिळणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेता ही योजना जि.प.स्तरावरुन तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या प्रसुतीसाठी चांगली सुविधा उपलब्ध होऊन आरोग्य सेवेवर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येईल याची मला खात्री आहे. 
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.नेताजी पाटील, जि.प. उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.जी.कोलते,आरोग्य उपसंचालक श्री.कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक श्री.माले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.वडगावे, जि.प.सदस्य श्री महेंद्र धुरगुडे, सौ.अस्मिताताई कांबळे, श्री अभिमन्यू शितोळे, श्री मदन बारकुल, सौ.सुरेखाताई जाधव, श्री.पंडीतराव टेकाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यां तसेच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बऱ्याच दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून आशा वर्कर्सना न्याय मिळवून दिल्याबद्दल आशा वर्कर्सनी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांची भेट घेवून आभार व्यक्त केले.